देवगड : तालुक्यातील बापर्डे गायकवाड वाडी येथील ग्रामपंचायत नजीक सोमवारी (२ जुलै) मध्यरात्री साडेदोनच्या सुमारास बिबट्या घराजवळील खळ्यात दिसून आल्याने खळबळ उडाली. सुनिल मधुकर कदम यांच्या घरासमोर लावलेल्या छोट्या टेम्पोखाली आश्रय घेतलेल्या कुत्र्यांवर बिबट्याने अचानक हल्ला केला. प्रतिकार करणाऱ्या कुत्र्यांपैकी एका कुत्र्याला बिबट्याने जबड्यात पकडले व तात्काळ जंगलाच्या दिशेने पलायन केले.
या घटनेचा संपूर्ण थरार घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. उर्वरित दोन कुत्र्यांनी जोरजोरात भुंकत प्रतिकार केला, मात्र बिबट्याची झेप त्यांना रोखू शकली नाही. या घटनेमुळे गावात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
भरवस्तीत बिबट्याचा वावर सुरूच आहे. यापूर्वी ही अशा घटना घडल्या देखील आहेत. ही चिंतेची बाब असून, वनविभागाने तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.