वेंगुर्ला-पुणे एसटीचा भटवाडी आडी येथे अपघात; प्रवासी किरकोळ जखमी

वेंगुर्ला : वेंगुर्ले येथून सकाळी 8 वाजता पुण्यासाठी निघालेल्या एसटी बसचा (राज्य परिवहन महामंडळाची बस) भटवाडी आडी स्टॉपजवळ अपघात झाला आहे. समोरून येणाऱ्या एका कॅन्टर वाहनाशी एसटीची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 8 वाजता वेंगुर्ले बसस्थानकातून पुण्याच्या दिशेने निघालेली एसटी बस भटवाडी आडी स्टॉप परिसरात पोहोचली असता हा अपघात झाला. अचानक समोरून आलेल्या भरधाव कॅन्टरने एसटीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांना किरकोळ दुखापती झाल्याचे सांगण्यात आले आहे. कोणतीही गंभीर दुखापत किंवा जीवितहानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

या अपघातामुळे भटवाडी आडी परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू आहे.

error: Content is protected !!