कर्ली नदीत उडी मारलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

युवक नेरूर गावचा रहिवासी

कुडाळ: कर्ली नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर आज सकाळी चेंदवण येथे आढळून आला आहे. सागर मारुती नारिंग्रेकर (वय अंदाजे ३८) असे या मृत युवकाचे नाव असून, तो नेरूर चव्हाटा, वासूशेवाडी येथील रहिवासी होता. या घटनेमुळे नेरूर परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, ३० जून २०२५ रोजी (दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास) सागरने नेरुरपार पुलावरून कर्ली नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना घडल्यानंतर तात्काळ स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने त्याचा शोध सुरू केला होता. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक मच्छीमार यांच्या मदतीने नदीपात्रात सर्वत्र शोधमोहीम राबवण्यात आली होती. मात्र, नदीतील पाण्याचा प्रवाह आणि गाळ यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते.

दोन दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर आज सकाळी (२ जुलै २०२५) चेंदवण येथील कर्ली नदीच्या पात्रात सागरचा मृतदेह तरंगताना आढळून आला. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे.

सागरने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण काय होते, याचा तपास कुडाळ पोलीस करत आहेत. या घटनेमुळे नेरूर आणि आजूबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!