विषारी अळंबी खाल्ल्याने ५ जणांना विषबाधा

माणगाव खोऱ्यातील घटना

कुडाळ : माणगाव – गोठोस येथे विषारी अळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना आज घडली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सुभाष पवार (३६), शीला पवार (३०), सुप्रिया पवार (८), सावन पवार (१०) आणि चंद्रशेखर स्वामी (४०) अशी विषबाधा झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, घराच्या बाजूला उगवलेली आळंबी खाल्ल्यानंतर त्यांना दुपारी दोनच्या सुमारास त्रास होऊ लागला. तात्काळ त्यांना माणगाव आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे चार दिवसांपूर्वी चौकुळ येथे घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनेची आठवण झाली आहे, जिथे चार व्यक्तींना विषारी आळंबीमुळे विषबाधा झाली होती. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने रवी जाधव, लक्ष्मण कदम आणि सुजय सावंत यांनी विषबाधा झालेल्या कुटुंबाला मदतीचा हात दिला. आळंबी खाताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने केले आहे, जेणेकरून अशा घटना टाळता येतील.

error: Content is protected !!