ब्युरो न्यूज: मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढला असून, हवामान विभागाने १९ ते २२ जून या कालावधीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या विभागांत हवामान प्रणाली सक्रीय झाली असून चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव जाणवू लागला आहे.मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि नवी मुंबईसह कोकणात वादळी वाऱ्यांसह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुलांच्या सुरक्षेसाठी शाळांना सुट्टी
रायगड जिल्ह्यात पावसाचा प्रचंड जोर असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अलिबाग, रोहा, तळा, महाड आणि पोलादपूर या तालुक्यांतील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबईत ऑरेंज अलर्ट
मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट, वाहतूक मंदावली मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने जोर धरला असून, काही भागांत ७० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. परिणामी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर वाहतूक मंदावली आहे. यामुळे शहरी जीवनावर परिणाम होत असून नागरिकांनी गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट अपग्रेड करत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, जे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत देणारे आहे.













