बांदा पुलावर कार ओहोळात कोसळली

मध्यरात्रीच्या घटनेत काहीजण अडकल्याची शक्यता;

शोधकार्य सुरू, NDRF ला पाचारण

बांदा : मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा बसस्थानकाजवळ असलेल्या दुसऱ्या पुलावरून मध्यरात्रीच्या सुमारास एक भरधाव कार (एमएच ०७ एजी ०००४) खाली ओहोळातील पाण्यात कोसळून अपघातग्रस्त झाली. ही घटना पहाटे १ वाजताच्या सुमारास घडली असून, ओहोळ तुडुंब भरलेला असल्याने आणि पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने कारमध्ये काही व्यक्ती अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या (NDRF) टीमला पाचारण करण्यात आले असून, शोधकार्य सुरू आहे.

आज सकाळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रशांत पांगम यांना ही अपघातग्रस्त कार निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ बांदा पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच बांदा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अपघात घडला त्यावेळी मध्यरात्री मुसळधार पाऊस सुरू असल्याने आणि पाण्याचा प्रचंड वेग असल्याने हा अपघात लगेच लक्षात आला नाही. कार पुलावरून थेट ओहोळातील पाण्यात कोसळल्याने ती पूर्णपणे पाण्यात बुडाली असण्याची शक्यता आहे. यामुळे कारमधील व्यक्तींना बाहेर पडणे कठीण झाले असावे, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या अपघातस्थळी पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित असून, NDRF टीमच्या मदतीने शोध आणि बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. ओहोळातील पाण्याची पातळी आणि प्रवाहामुळे शोधकार्य आव्हानात्मक बनले आहे. कारमध्ये नेमके किती लोक होते, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

error: Content is protected !!