सावंतवाडी : देवसू येथील बागेत कामासाठी असलेल्या नेपाळी दांपत्याला कुडाळ परीसरात अनोळखी व्यक्तीने मारहाण केली. सदर संशयिताने आपण पोलीस असल्याची बतावणी करून त्या दाम्पत्याकडे आधारकार्डची मागणी केली. त्यानंतर दाम्पत्यास बेदम मारहाण केली.
सदर नेपाळी राजू बसने सावंतवाडी पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना माहिती दिली. राजू हा आपल्या पत्नी व दोन छोट्या मुलांसह देवसू येथे एका बागायतदाराकडे कामाला आहे. आठवड्यापूर्वी तो कुडाळ तालुक्यात आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. तेथून पुन्हा देवसू येथे येत असताना कुडाळ परिसरात त्याला एका अनोळखी व्यक्तीने पोलीस असल्याचे सांगून त्याच्याकडून सर्व माहिती घेतली व तुझ्याकडे आधारकार्ड नाही, असे बोलत बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या पत्नीलाही मारहाण केली. या घटनेनंतर देवसू येथील बागायतदारांनी सावंतवाडीत धाव घेतली. सदर संशयिताचा शोध घ्यावा, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.