आमिष दाखवून महिलांची फसवणूक
देवगड : शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करून जादा परताव्याचे आमिष दाखवून येथील एका महिलेने अनेक महिलांची सुमारे दहा ते बारा लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध आज येथील पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये घडला. संबंधित महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक भरत धुमाळ यांनी दिली.
याबाबत धुमाळ यांनी दिलेली माहिती अशी : संबंधित महिलेने सप्टेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत शहरातील काही महिलांकडून उत्तम परतावा देणारी योजना असल्याचे आमिष दाखवून पैसे जमा करून घेतले होते. ती रक्कम शेअर बाजारात गुंतवून पैसे दुप्पट करून देते, काहींना जादा रकमेचा परतावा देते, असे आमिष दाखवले. यातून संबंधित गुंतवणूकदार महिलांना नोटरी करून दिली होती. तसेच काहींना परताव्याच्या रकमेपोटीचे मार्च २०२५ अखेरचे धनादेशही दिले होते; मात्र संबंधित गुंतवणूकदार महिलांनी धनादेश वटवण्याचा प्रयत्न केला असता ते वटले नाहीत. यातून संबंधित गुंतवणूकदार महिलांना एक रुपयाचाही परतावा मिळू शकला नाही. यातून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलांनी आज येथील पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी आर्थिक फसवणूक तसेच महाराष्ट्र ठेवीदार अधिनियमांतर्गत संबंधित फसवणूक करणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार नोंदवत तिला तातडीने ताब्यात घेतले.
हवालदार सविता माळी, कॉन्स्टेबल दर्शना देवगडकर यांनी कारवाई केली. संबंधित महिलांची मिळून सुमारे दहा ते बारा लाखांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. पोलिस उपनिरीक्षक संतोष भालेराव तपास करत आहेत. दरम्यान, याच महिलेकडून शहरातील आणखी कोणा महिलांची फसवणूक झाली असल्यास अशा महिलांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन धुमाळ यांनी केले आहे.