आमदार निलेश राणे यांच्या सातत्य पाठपुराव्यामुळे गणेश घाटाला निधी उपलब्ध झाला – नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर
गणेश घाटाच्या कामाची पाहणी करून त्याचे श्रेय घेण्याचा सुरू असलेला प्रयत्न म्हणजे “काम आम्ही केले नसले तरी श्रेय मात्र आम्हालाच मिळावे” अशा मानसिकतेचा प्रकार असल्याची टीका नगराध्यक्षांनी केली आहे.
“गणेश घाटाचे काम मंजूर असणे आणि प्रत्यक्ष बांधकामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. केवळ मंजुरीचे कागद दाखवून विकासकामे पूर्ण होत नाहीत. प्रत्यक्ष निधी उपलब्ध झाल्यानंतरच कामाला गती मिळते. गणेश घाटाचे काम निधीअभावी रखडले होते, ही वस्तुस्थिती नाकारता येणारी नाही,” असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
माननीय आमदार श्री. नीलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गणेश घाटाच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी निधी नगरपंचायतीला उपलब्ध झाला आणि प्राप्त निधीमुळे कामाला वेग आला, असेही त्यांनी सांगितले.
“गेल्या सहा महिन्यांपासून नगराध्यक्ष म्हणून मी स्वतः या कामावर सातत्याने लक्ष ठेवले आहे. संबंधितांकडून कामाचा आढावा घेतला, अडचणी सोडविल्या आणि काम वेगाने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. एका दिवसाच्या स्थळ पाहणीने गणेश घाट उभा राहत नसतो; त्यासाठी सातत्याने काम करावे लागते. हे कुडाळची सुज्ञ जनता निश्चितच जाणते,” असे नगराध्यक्षांनी नमूद केले.
दरम्यान, गणेश घाटाचे काम पूर्णत्वाकडे आलेले असताना अचानक स्थळ पाहणी करून फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, “कोणी कितीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्यक्ष काम कोणी केले आणि कामाला निधी कोणी उपलब्ध करून दिला, हे कुडाळकरांच्या डोळ्यांसमोर आहे,” असा टोला नगराध्यक्षांनी लगावला.
“विकासकामे प्रत्यक्षात होत असताना काहींच्या पोटशुळाची कारणेही जनतेला आता समजू लागली आहेत. दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्यापेक्षा शहराच्या विकासात सकारात्मक योगदान द्यावे,” असे आवाहनही त्यांनी केले.
गणेश घाटाचे डिझाईन आणि संकल्पना साधी, आकर्षक व कुडाळ शहराच्या सौंदर्यात भर घालणारी असून, काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
“ मागील १० वर्षे माजी आमदार सत्तेत असताना कुडाळ शहरासाठी भरीव योगदान देऊ शकलेले नाहीत व आता खजील होऊन स्वत:चे अपयश लपविण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. केवळ जनेतेच्या नजरेत राहून सहानभूती मिळवण्यासाठी ही धडपड आहे. ” आपण सत्ताधारी असताना बरीच आश्वासने जनतेला दिलात पण त्यापैकी काहीच साध्य करू शकला नाही उलट जनेतेने माननीय श्री. निलेशजी राणे यांच्या हाती कुडाळचा विकास सोपिवला असून माननीय श्री. निलेशजी राणे यांच्या कणखर आणि सक्षम नेतृत्वाखाली त्याची टीम, सर्व नगरसेवक सक्षम आहेत.
कुडाळकरांनी माननीय आमदार श्री. नीलेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. २१ व्या शतकातील आधुनिक, सुंदर आणि विकसित कुडाळ घडवण्याचा दिलेला शब्द आम्ही निश्चितपणे पूर्ण करू. श्रेयासाठी नव्हे, तर प्रत्यक्ष विकासासाठी आमचे काम सुरू आहे,” असा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला.

Subscribe










