न्यायालयात हजर केले असता ११ जून पर्यंत पोलीस कोठडी
कुडाळ : पिंगुळी काळेपाणी येथील घरफोडीसह अन्य पाच गुन्ह्यात सहभाग असलेला आकेरी येथील संशयित रामचंद्र उर्फ अंकुश घाडी (वय ३०) याला कुडाळ पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला ११ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंगुळी-काळेपाणी येथील सुरेखा पद्माकर तानावडे यांच्या बंद घराला टार्गेट करत चोरट्यांनी चोरी केली होती. या घरफोडीत रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिन्यांसह एकूण १ लाख १६ हजाराचा ऐवज चोरीस गेला आहे. याबाबत सुरेखा तानावडे यांचा भाचा नंदन विश्वनाथ गोवेकर (वय ४२, रा. पिंगुळी) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती दरम्यानच्या कालावधीत दोन दिवसांपूर्वीच नाबरवाडी येथे विनोद रुद्रे यांच्या बंद घरात प्रवेश चोरीची घटना घडली होती त्या अगोदर झाराप येथे दोन व पिंगुळी येथे दोन घटना घडल्या होत्या सुरेखा पद्माकर तानावडे या पिंगुळी काळेपाणी येथील पेट्रोल पंपाच्या अलीकडे असलेल्या घरी राहतात. सौ. सुरेखा तानावडे या ६ जून रोजी सायंकाळी ६.३० वा मुलगा, सुन व नातवंडे यांच्यासह आपला मोठा मुलगा स्नेहल याच्या मुलाचा वाढदिवस असल्याने मुंबई खारघर पनवेल येथे गेल्या होत्या. यानंतर ७ जून रोजी दुपारी सौ सुरेखा तानावडे यांच्या बहीणीचा मुलगा नंदन गोवेकर यांना सौ सुरेखा तानावडे यांच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने कॉल करुन ‘तुझी मावशी हीचे घराचा दरवाजा उघडा आहे. तुझी मावशी हीने खारघर येथे घर बंद करुन जाताना घराची चावी अन्य कोणाकडे दिलेली आहे काय याबाबत खात्री करुन सांग’ असे सांगितले. त्यानंतर नंदन गोवेकर यांनी याबाबत खात्री करुन मावशी हीने आपल्या घराची चावी अन्य कोणाकडे दिली नसल्याचे सांगितले व तात्काळ १२.३० वा. चे मानाने मावशी सौ सुरेखा यांच्या घरी गेले. त्यावेळी तीचे कौलारु घराच्या लाकडी दरवाज्याच्या कडी कोयंडा तुटलेला व दरवाज्याचे कुलुप तुटलेल्या स्थितीत घराचे खिडकीवर ठेवलेले आढळले. घराच्या दरवाज्या उघडा असल्याचे दिसल्याने घरात जावुन खात्री केली असता यावेळी कौलारु घराच्या खोलीतील २ पत्र्याची कपाटांचे दरवाजे उघडे होते व कपाटामधील सामान विस्कटलेले होते. तसेच कौलारु घराला लागुन असलेल्या स्लॅबच्या घराच्या खोलीतील दोन पत्र्याच्या कपाटांचे दरवाजे व १ लाकडी कपाटाचा दरवाजा असे सर्व कपाटांचे दरवाजे उघडे होते. आतील सामान विस्कटलेले होते. यामध्ये रु. ४० हजार रोख रक्कम, रु. २४ हजार किमतीची ८ ग्रॅम वजनाची सोन्याची जुनी वापरती चैन, रु. २४ हजार किमतीचे ८ ग्राम वजनाचे वापरते सोन्याचे मंगळसूत्र, रु. १८ किमतीच्या प्रत्येकी ३ ग्रॅम वजनाच्या जुन्या वापरत्या सोन्याच्या दोन अंगठ्या, रु. १० हजार किमतीचे जुने वापरते २०० ग्रॅम वजनाचे चांदीचे ताट व वाटी असा एकूण १ लाख १६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे आढळून आले.
दरम्यान या घटनेचा तपास कुडाळ पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय जलद लावून या प्रकरणात असणाऱ्या संशयित रामचंद घाडी याला अटक करण्यात आली त्याला न्यायालयात हजर केले असता ११ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे त्याने पाचही गुन्ह्याची कबुली दिली आहे मुद्देमाल अजून रीकव्हर झाला नाही असे पोलिस निरीक्षक मगदूम यांनी सांगितले













