दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पत्नीचा मृत्यू

मनोरुग्ण मुलाच्या सततच्या त्रासाला कंटाळून उचलले पाऊल

तळेबाजार-चांदोशी येथील घटना

देवगड : मनोरुग्ण मुलाच्या सततच्या त्रासाला कंटाळून तळेबाजार चांदोशी येथील संजय दाजी म्हापसेकर (६३) व त्यांची पत्नी सौ. कांचन संजय म्हापसेकर (५८) यांनी ३० मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मनोरुग्ण मुलाच्याच झोपेच्या गोळ्या खाऊन व घरातील विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास अत्यवस्थ स्थितीत त्यांना नातेवाईकांनी जामसंडे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, औषधोपचार सुरू करण्यापूर्वी सौ. कांचन यांचा मृत्यू झाला. तर संजय म्हापसेकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार संजय म्हापसेकर यांचा मनोरुग्ण मुलगा सिद्धेश संजय म्हापसेकर (३०) याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय म्हापसेकर हे पत्नी कांचन, मुलगे सिद्धेश व पूर्वांग यांच्यासमवेत तळेबाजार चांदोशी येथे (साई मंदिर रस्त्यानजीक) येथे वास्तव्यास आहेत. मुंबई येथे ‘एलआयसी’मधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मूळ गावी येत राहत्या घरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांचा मुलगा सिद्धेश हा मनोरुग्ण असून त्याच्यावर रत्नागिरी मनोरुग्णालयामार्फत उपचार सुरू आहेत. त्याचे मानसिक स्वास्थ बिघडलेले असते. त्याला दारुचेही व्यसन आहे. मात्र, तो औषधे घेत नव्हता. तसेच घरात वारंवार वादही निर्माण करीत होता. स्वतःच्या खर्चासाठी तो आपल्या आई-वडिलांकडे सतत पैशाची मागणी करीत असे. सिद्धेशच्या या सततच्या त्रासाला कंटाळून ३० मे रोजी संजय म्हापसेकर व त्यांची पत्नी सौ. कांचन यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला व रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सिद्धेशच्या औषधोपचारातील झोपेच्या गोळ्या खाऊन व त्यानंतर झुरळ मारण्याचे औषध प्राशन केले. यावेळी त्यांचा दुसरा मुलगा पूर्वांग हा घरात नव्हता.

शनिवारी सकाळी ७.३० वा. च्या सुमारास अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या संजय म्हापसेकर यांनी त्यांचे सख्खे भाऊ गजानन म्हापसेकर यांना फोन करून स्वतःची व पत्नीची तब्येत बरी नसल्याचे सांगून दोघांनाही डॉक्टरांकडे नेण्यासाठी त्यांना घरी बोलाविले. गजानन यांनी तात्काळ संजय म्हापसेकर यांच्या घरी जात त्यांना व त्यांची पत्नी कांचन यांना तात्काळ जामसंडे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, सौ. कांचन यांच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर संजय यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

वडिलांची मनोरुग्ण मुलाविरुद्ध तक्रार

संजय म्हापसेकर यांनी मनोरुग्ण मुलाच्या त्रासाला कंटाळून स्वतः सह पत्नीने मनोरुग्ण मुलाच्या झोपेचा गोळ्या खाऊन व झुरळ मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात पत्नी सौ. कांचन हिचा मृत्यू झाला, अशी फिर्याद देवगड पोलिसांकडे दिली. या फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी संशयित सिद्धेश म्हापसेकर याच्याविरूद्ध भारतीय न्याय संहिता १०८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे करीत आहेत. दरम्यान, सायंकाळी उशिरा देवगड ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून सौ. कांचन यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

error: Content is protected !!