बेकायदा वाळूविरोधात कुडाळ पोलिसांची कारवाई

कुडाळ : शासनाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीररित्या उत्खनन केलेल्या वाळूची चोरी करून तिची विनापरवाना अवैधरित्या चोरटी वाहतूक करीत असताना कुडाळ पोलिसांनी दोन डंपरवर कारवाई केली. ही कारवाई पिंगुळी ते वडगणेश रेल्वे ब्रिज जवळ करण्यात आली. यामध्ये चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून तीस हजार रुपये किमतीची वाळू आणि दोन डंपर जप्त करण्यात आले आहेत.

कुडाळ पोलीस ठाण्यातून दिलेल्या माहिती नुसार, पहिल्या डंपर प्रकरणी पोलीस शिपाई सुबोध संभाजी मळगावकर यांनी याबाबत फिर्याद दिली असून पिंटूकुमार सुखदेव सिंग (वय ३१, राहणार पेडणे बस स्टॉप जवळ) व विशाल शिवाजी केरवडेकर (वय ३९, रा मडगाव गोवा) यांच्यापैकी संशयित आरोपी क्रमांक १ याने संशयित आरोपी क्रमांक २ यांच्या संगनमताने डंपर क्रमांक जीए-०८-बीव्ही-५५६७ यामध्ये शासनाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीररित्या उत्खनन केलेल्या वाळूची चोरी करून तिची विनापरवाना अवैधरित्या चोरटी वाहतूक करीत असताना मिळून आला, असे तक्रारीत म्हटले आहे. यामध्ये पंधरा हजार रुपये किमतीची वाळू व पाच लाख रुपये किमतीचा डंपर जप्त करण्यात आला आहे. दुसऱ्या डंपर प्रकरणी पोलीस हवालदार समीर रामचंद्र कोचरेकर यांनी फिर्याद दिली. राजू केशप्पा राठोड (वय २९, राहणार बांदा मूळ कर्नाटक) व शमित याकूब जद्दी (वय २९ रा झाराप-कामळेवीर) हे संगनमताने डंपर क्रमांक जीए-०७- टी-२५१४ मधून शासनाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीररित्या उत्खनन केलेली वाळूची चोरी करून तिची विनापरवाना अवैधरित्या चोरटी वाहतूक करीत असताना मिळून आले. पंधरा हजार रुपये किमतीची वाळू व पाच लाख रुपये किमतीचा डंपर जप्त करण्यात आला आहे. दरम्यान चारही संशयित आरोपीना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली, अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

error: Content is protected !!