डंपरच्या धडकेत पादचारी गंभीर

कुडाळ पोस्ट कार्यालय चौकातली घटना

कुडाळ : कुडाळ पोस्ट ऑफीस चौक येथे डंपरच्या धडकेत पादचारी नागरिकाला गंभीर दुखापत झाली. सुभाष बापू कुबल (वय 67, रा.दाभोली तेलीवाडी, ता.वेंगुर्ले) असे जखमी पादचारी नागरिकाचे नाव आहे. त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना स्थानिक नागरीकांच्या सहाय्याने नजिकच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी तातडीने गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास झाला.


शहरातील पोस्ट ऑफीस चौकात रस्ता ओलांडणारे पादचारी सुभाष कुबल यांना गोवा येथून मालवणच्या दिशेने जाणाऱ्या डंपर चालक मेलवीन झुजे परेरा (वय 43, रा.मडगाव गोवा) यांच्या ताब्यातील डंपरची धडक बसली. यात कुबल रस्त्यावर पडले, त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. स्थानिक रिक्षा व्यावसायिक आणि नागरिकांनी त्यांना लागलीच नजिकच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केले. मात्र प्रकृती चिंताजनक बनल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. अपघाताची माहीती मिळताच शहरातील राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनींसह नागरिकांनी रूग्णालयात धाव घेत, जखमीला उपचारासाठी तसेच नातेवाईकांचा शोध घेण्यास सहकार्य केले. घटनास्थळी कुडाळ पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. याबाबतची खबर पोहेकाॅ. पी.एन.बुथेलो यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार डंपरचालक मेलवीन परेरा याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती पोलिस ठाण्यातून देण्यात आली. दरम्यान कुडाळ शहरातून होणारी बेदरकार डंपर वाहतूक कळीचा मुद्दा बनला आहे.

error: Content is protected !!