महायुती सरकारकडून ग्रामीण भागातील जनतेला घरपट्टीत पन्नास टक्के सवलतीचे “गिफ्ट”

“मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” अंतर्गत ग्रामपंचायतींकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुलीत मिळणार 50% सवलत

शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडेंची माहिती

ग्रामपंचायतींचे “आर्थिक स्वावलंबन” हे समृद्ध गावांच्या निर्मितीसाठी अत्यावश्यक असल्याने, तसेच शासनाच्या सर्व विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन संपूर्ण राज्यात “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान”उपक्रम राबवित आहे.

या पार्श्वभूमीवर “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” अंतर्गत ग्रामपंचायतींच्या थकीत कर वसुलीला गती देण्यासाठी, थकबाकीच्या एक रकमी वसुलीकरिता आणि थकबाकीची वसुल केलेली रक्कम विकास प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी ग्रामपंचायतींना निवासी मालमत्ता कर व अन्य करांच्या थकबाकी वसुलीत सवलत देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने पारित केला आहे. यामध्ये राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील निवासी मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर, पाणी पट्टी आणि दिवा बत्ती कर इत्यादी करांच्या चालू वर्षीची घरपट्टी व मागील थकीत घरपट्टीची पूर्ण रक्कम एक रक्कमी भरणा करत असल्यास एकूण थकबाकीच्या ५०% सवलत देण्यात येणार आहे. सदर सवलत केवळ निवासी मालमत्ताधारकांसाठी (Residential Property Holders) असून 31 डिसेंबर 2025 पूर्वी भरणा करत असल्यास सदर सवलत लागू राहणार आहे. मात्र यासाठी ग्रामपंचायतींनी “विशेष ग्रामसभा” बोलावून त्यात सवलत देण्याबाबत बहुमताने ठराव मंजूर करणे अनिवार्य करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे. महायुती सरकारकडून ग्रामीण भागातील जनतेला हे सवलतीचे एक प्रकारे मोठे गिफ्ट असून ग्रामीण भागातील जनतेकडून याचे स्वागत करण्यात येत आहे.

error: Content is protected !!