संतोष हिवाळेकर / पोईप
मालवण तालुक्यातील वडाचापाट कुळकरवाडी येथील रहिवासी गुरुदास विष्णू पालव (४६) यांनी घरापासून नजीकच कांदळाच्या झाडाला कात्याच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ११:३० च्या दरम्याने निदर्शनास आली.
गुरुदास पालव हे बुधवारी सायंकाळी ५ वाजता च्या दरम्याने नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी परिसरात गेले होते. रात्री उशिरा घरी न आल्याने नातेवाईकांनी व वाडीतील ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्रीपर्यंत त्यांचा शोध लागला नाही दरम्यान गुरुवारी सकाळी बीएसएनएल टॉव्हरच्या १०० फूट अंतरावर झाडीमध्ये कांदळाच्या झाडाला कात्याच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली यावेळी वडाचापाट तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रथमेश पालव यांनी घटनेची खबर वडाचापाट पोलीस पाटील विजय पालव यांना दिल्यावर पोलीस पाटील पालव यांनी याबाबतची माहिती मसुरे पोलीस दूरक्षेत्राला दिली. यावेळी मसुरे पोलीस दूरक्षेत्राचे ए.पी.आय. माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे पाठविण्यात आला. गुरुदास पालव हे वडाचापाट परिसरात शेती व मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. ते या परिसरात मनमिळावू स्वभावाने परिचित होते. दरम्यान आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या पाश्चात पत्नी मुलगा मुलगी भाऊ भावजई पुतणे असा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. याबाबतचा अधिक तपास म्हणून मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे पोलीस कर्मचारी करत आहेत.













