मळगाव येथील अपघातात जखमी ग्रामसेवकाचे निधन

वेंगुर्ले : गोवा महामार्गाच्या झाराप ते पत्रादेवी बायपासवर मळगाव कुंभार्ली येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले उभादांडा सुखटणकरवाडी येथील रहिवासी आणि तिरोडा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक ज्ञानेश अंकुश करंगुटकर (वय ५४) यांचे आज शुक्रवारी पहाटे गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रामसेवक ज्ञानेश करंगुटकर हे आपल्या ताब्यातील दुचाकीने ओरोस सिंधुदुर्ग येथून आपले शासकीय कामकाज आटोपून मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासने मळगावच्या दिशेने वळत होते. त्याचवेळी समोर येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक बसून हा अपघात झाला होता. अपघातात दोन्ही मोटरसायकल वरील चौघे जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना गोवा बांबुळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश करंगुटकर यांचे उपचारा दरम्यान निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. ज्ञानेश करंगुटकर यांचा शांत स्वभाव, सर्वांना समजून घेण्याची वृत्ती, नाट्य क्षेत्राची आवड असल्याने सामाजिक नाटकांमध्ये सहभाग, मनमिळावू आणि हसत चेहरा असायचा. त्यांच्या निधनाने उभादांडा गावासह तिरोडा गावातही हळहळ व्य करण्यात येत आहे.

error: Content is protected !!