आंगणेवाडी हिरक महोत्सव एकांकिका स्पर्धेत भाईंदरची ‘पाटी’ एकांकिका प्रथम, पुण्याची ‘बॉईल्ड शुद्ध शाकाहारी’ एकांकिका ठरली द्वितीय

मालवण : कोकणची भूमी ही नाट्यकलावंताची भूमी आहे, या मातीने नाटकावर आणि लोककलेवर केलेले प्रेम हे कलावंत आणि इथल्या समाजरचनेच्या प्रेक्षक या दोघाच्या अतुट नाट्यप्रेमाची गोष्ट आहे. शहरी कलावंतानी ग्रामीण रंगमंचावर येताना नाट्यकलाकृतीची अवीट गोडी तेवढ्याच ताकदीने मांडली पाहिजे. आजही पुण्यामुंबईपेक्षाही गावखेड्याने यात्रा वार्षिकाच्या निमित्ताने जपलेली नाट्यसंस्कृती ज्यावेळी आपण कलावंत म्हणून समजून घेऊ त्याचवेळी खऱ्या अर्थाने कलावंत म्हणून ग्रामीण मंचाची ताकद किती मोठी आहे त्याची ताकद समजून जाईल असे प्रतिपादन ऋषी देसाई यांनी आंगणेवाडी एकांकिका महोत्सवाच्या निमित्ताने केले.

आंगणेवाडी नाट्यमंडळ मुंबईच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त मुंबई पुणे कोल्हापूर येथे विविध स्पर्धेत नावाजलेल्या एकांकिका स्पर्धांचा एकांकिका महोत्सव आंगणेवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी या स्पर्धेत एकदम कडक नाट्यसंस्था भाईंदर संस्थेच्या पाटी एकांकिकेला प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले , तर कलादर्शन पुणे निर्मित बॉईल्ड – शुद्ध शाकाहारी एकांकिकेला द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या स्पर्धेसाठी ख्यातनाम दिग्दर्शक महेश सावंत पटेल आणि पत्रकार ऋषी देसाई यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

श्री देवी भराडी रंगमंचावर पार पडलेल्या या एकांकिका स्पर्धेत कलांश थिएटर यांची क्रॅक इन द मिरर, एकदम कडक नाट्यसंस्थेची पाटी, जिराफ थिएटर यांची गुडबाय किस , कलादर्शन पुणे यांची बॉईल्ड शुद्ध शाकाहारी , गायन समाज देवल क्लब कोल्हापूर यांची ऑलमोस्ट डेड एकांकिका सादर करण्यात आली . या एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने आंगणेवाडी ग्रामस्थांसह उपस्थित नाट्यरसिकांना दर्जेदार नाट्यपर्वणी मिळाली .

या एकांकिका स्पर्धेत उपविजेते संघ म्हणून गुड बाय किस, क्रॅक इन द मिरर, आणि ऑलमोस्ट डेड या एकांकिकेना गौरवण्यात आले. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रणय गायकवाड (पाटी ), सर्वोत्कृष्ट लेखन भावेश आमडस्कर (पाटी), सर्वोत्कृष्ट अभिनेता – औंदुबर बाबर (पाटी ), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ऋतुजा बोटे (बॉईल्ड ) – सर्वोत्कृष्ट बालकलाकार – देव चोपडे यांना पारितोषिकांने गौरवण्यात आले.

या एकांकिका स्पर्धेसाठी परिक्षक महेश सावंत पटेल यांनी अशा प्रकारच्या दर्जेदार एकांकिका महोत्सवाचे आयोजन गावागावात व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करताना महोत्सव दरवर्षी आंगणेवाडीत आयोजित करण्यात यावा ही भावना व्यक्त केली. पारितोषिक वितरण सोहळ्यास यावेळी आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष सतीश आंगणे, सचिव अर्जुन आंगणे, कार्याध्यक्ष सीताराम आंगणे , गजानन आंगणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या दिमाखदार सोहळ्याचे प्रसिद्ध निवेदक अक्षय सातार्डेकर यांनी साजेश्या शब्दात सुत्रसंचालन करुन प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

error: Content is protected !!