पालघर: पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते अशोक धोडी यांची हत्या करण्यात आली आहे. अशोक धोडी हे सोमवारी 20 जानेवारीपासून बेपत्ता होते.पालघरमधून शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोंडी बेपत्ता झाल्याने खळबळ माजली असतानाच एक मोठी घडामोड समोर आली आहे. तलावात सापडलेल्या अशोक धोडी यांच्या कारच्या डिक्कीतच त्यांचा मृतदेह आढळला आहे. अशोक धोडी हे 20 जानेवारीपासून बेपत्ता होते. त्यांचं अपहरण झाल्याचा संशय कुटुंबाकडून व्यक्त केला जात असतानाच गाडीच्या डिक्कीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह अशोक धोडींचाच असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. यामुळे आता या तपासाला वेगळं वळण मिळालं आहे.
काय आहे सविस्तर वृत्त?
20 जानेवारीला संध्याकाळी अशोक धोडी यांची लाल रंगाची ब्रिझा कार गुजरातच्या दिशेनं गेली असल्याचा सीसीटीव्ही समोर आला होता. त्यामुळे अशोक धोंडी बेपत्ता झाले नसून त्यांचं अपहरण झाल्याचा आरोपकुटुंबियांनी केला होता. तसंच संशयित आरोपींची नावंही कुटुंबियांनी पोलिसांना दिलीय होती. अशोक धोडी यांच्या अपहरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. पोलिसांकडून त्यांचा सातत्याने शोध घेतला जात होता. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
कसा घेतला शोध?
गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अशोक धोडी यांचा मृतदेह आढळला आहे. त्यांच्या गाडीच्या डिकीत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.पोलिसांकडून सुरु होता. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. यावेळी चौकशीदरम्यान पोलिसांना त्यांच्या कारची माहिती मिळाली. यानुसार गुजरातमधील भिलाडजवळ असलेल्या सरिग्राम मालाफलिया येथे एका बंद दगड खाणीत त्यांची कार असल्याचे समोर आले होते. यानंतर गेल्या दोन ते तीन तासांपासून या खाणीत शोधकार्य सुरु होते. ही कार बाहेर काढण्याआधी गोताखोरांनी एक काळ्या रंगाचे जॅकेट आणि सफेद रंगाचा हेडफोन मिळाला होता.यानंतर पाण्याची खोली जास्त असल्याने कार काढण्यामध्ये मोठ्या अडचणी आल्याचेही बघायला मिळाले आहे. गोताखोरांच्या मदतीने बंद पडलेल्या खाणीतून कार काढण्यात आली आहे. या कारच्या डिकीत अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला आहे. दृश्यम सिनेमातील दृश्याप्रमाणेच हा प्रकार घडला आहे. तब्बल अडीच तासानंतर ही कार पाण्यातून काढण्यात आली.













