१८ तासात आरोपी जेरबंद
कणकवली येथील घटना
कणकवली : शहरातील चायनीज सेंटरमध्ये काम करणाऱ्या नेपाळी कामगारावर चाकूने वर्मी घाव घालून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीस अवघ्या १८ तासांत सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली आहे. ही कारवाई ७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कणकवली रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आली.

सुनील इंदर परिवार (वय २७, मूळ रा. नेपाळ, सध्या रा. कणकवली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
६ जानेवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अज्ञात इसमाने लोकेश बिस्त या नेपाळी कामगाराच्या डोक्यावर चाकूने वर्मी घाव घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर जखमी लोकेश बिस्त याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात ७ जानेवारी रोजी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास कणकवली पोलिसांसह सिंधुदुर्ग एलसीबीचे पथक करत होते. तपासादरम्यान हल्ला करणारा आरोपी सुनील परिवार हा कणकवली रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली. त्यानुसार एलसीबी पथकाने तात्काळ सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले आणि कणकवली पोलिसांच्या स्वाधीन केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सूचनेनुसार पीएसआय अनिल हाडळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार ज्ञानेश्वर तवटे व किरण देसाई यांच्या पथकाने केली.


Subscribe





