नात्याला काळिमा; अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत धमकी

२० वर्ष सश्रम कारावास

सिंधुदुर्गनगरी : नात्यातील अल्पवयीन मुलीला धमकावत वारंवार लैंगिक अत्याचार करून मातृत्व लादल्याप्रकरणी दोषी ठरवत आदित्य उर्फ मंदार अजित परब (वय 19 रा आरोस, गावठाण) व किरण केशव परब (रा न्हावेली, रेवटीवाडी) या दोघांना जिल्हा विशेष न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी प्रत्येकी 20 वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात भारतीय दंड संहितेतील तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गंभीर कलमे लावण्यात आली आहेत.

सावंतवाडी तालुक्यातील एका गावात सप्टेंबर 2019 ते ऑगस्ट 2020 या कालावधीत हा प्रकार घडला. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही आरोपींनी तिच्या अज्ञान व असहायतेचा फायदा घेत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या प्रकाराबाबत वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचेही तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणात दोन आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, मुख्य आरोपीने वारंवार पीडितेवर अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले आहे. दुस-या आरोपीनेही पीडितेला धमकावून मानसिक त्रास दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. पीडितेच्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पीडितेची वैद्यकीय तपासणी, जबाब नोंद, पंचनामे तसेच आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यात आली. वैद्यकीय व वैज्ञानिक अहवाल तसेच साक्षीदारांचे जबाब तपासात समाविष्ट करण्यात आले होते. पोलिसांनी सर्व पुरावे संकलित करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते.सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता रंजना पाटील व गजानन तोडकरी यांनी पहिले काम पाहिले.

error: Content is protected !!