मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
मुंबई: मत्स्यव्यवसाय विभागाच्या १०० दिवसांच्या नियोजनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. गोड्या पाण्यातील मासेमारी वाढविण्यासाठी धोरण तयार करावे असे आदेश त्यांनी यावेळी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे मत्स्यव्यवसाय विभागाच्या 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचा मंत्री नितेश राणे देखील उपस्थित होते. या बाबत त्यांनी ट्विट केल आहे. यामधे त्यांनी म्हंटले आहे की,माननीय मुख्यमंत्र्यांनी आज मत्स्य व्यवसाय विभागाच्या १०० दिवसांच्या नियोजनाचा आढावा घेतला. गोड्या पाण्यातील खंडांतर्गत मासेमारीत उत्पादनवाढीची मोठी संधी असून, त्यासाठी ठोस धोरणे तयार करण्याच्या आणि मत्स्यबीज उपलब्धता वाढवण्यासाठी धेयात्मक प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. तसेच, सागरी आणि धरण क्षेत्रातील मासेमारीसाठी सर्वसमावेशक धोरण तयार करून केंद्राच्या कृषी व्यवसाय दर्जाच्या योजनांचा लाभ राज्यातील व्यावसायिकांना मिळवून देण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. यावेळी मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, सागरी क्षेत्रातील ड्रोन सर्वेक्षण, मासेमारी बोटींसाठी अनुदान आणि सुविधा, मत्स्य बंदर, मत्स्य बाजार आणि मरोळ येथील आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार यासारख्या उपक्रमांची माहिती सादर केली.
नेमकं काय आहे आढाव्यात?
१. मत्स्यव्यवसाय विभागाच्या १०० दिवसांच्या नियोजनाच्या आढाव्यात राज्यात गोड्या पाण्यातील खंडांतर्गत मासेमारीला मोठा वाव असल्याने यामध्ये वाढ करण्यासाठी तसेच मत्स्यबीज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यासाठी धोरण तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
२. मत्स्यबीज उपलब्धता हे गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने यासाठी धेयात्मक काम करण्याचे निर्देश
३. राज्यात ज्या ठिकाणी मत्स्य बीज प्रक्रियेविषयी चांगले काम होत आहे त्यांना प्रोत्साहन आणि निधी देण्याच्या सूचना
४. सागरी मासेमारीविषयी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश
५. केंद्र शासनाने मत्स्य व्यवसायास कृषी व्यवसायाचा दर्जा दिला असल्याने केंद्राच्या नियमानुसार राज्यातील मत्स्य व्यावसायिकांना लाभ देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना
६. धरण क्षेत्रातील मासेमारी व्यवसायासाठीही सर्वसमावेशक धोरण तयार करावे; मासेमारी संस्थांनी पारदर्शकतेवर भर द्यावा.













