1 ऑगस्ट पासून बँकिंग , UPI वापरामध्ये मोठे बदल

बॅलन्स तपासण्यावर मर्यादा;पेमेंट अयशस्वी झाल्यास…

ब्युरो न्यूज: आज 1 ऑगस्ट पासून बँकिंग सुधारणा कायदा लागू झाला असून UPI पेमेंट मध्ये सुद्धा मोठे बदल करण्यात आले आहेत.

UPI वापराच्या नियमांत मोठे बदल

१ ऑगस्टपासून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्रणालीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल लागू होत आहेत.बॅलन्स तपासण्यावर मर्यादा : आता तुम्ही एका दिवसात UPI द्वारे फक्त ५० वेळाच तुमच्या बँक खात्यातील शिल्लक (बॅलन्स) तपासू शकाल.

खात्यांची यादी पाहण्यावर मर्यादा :

बँक खात्यांची यादी पाहण्याची मर्यादा आता दिवसाला २५ वेळा इतकी असेल.

ऑटो-पे व्यवहारांच्या वेळेत बदल :

हप्ते, म्युच्युअल फंड एसआयपी (SIP) आणि ओटीटी सबस्क्रिप्शनसारखे वारंवार होणारे UPI ऑटो-पे व्यवहार आता फक्त कमी वर्दळीच्या वेळेतच (non-peak hours) पूर्ण केले जातील. हे व्यवहार सकाळी १० पूर्वी, दुपारी १ ते ५ दरम्यान आणि रात्री ९:३० नंतर पार पडतील. याचा अर्थ, जर तुमचे नेटफ्लिक्सचे बिल सकाळी ११ वाजता कट होत असेल, तर आता ते या वेळेच्या आधी किंवा नंतर कट होऊ शकते.

पेमेंट अयशस्वी झाल्यास… :

तुमचे UPI पेमेंट अयशस्वी झाल्यास, त्याचे स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला फक्त तीन संधी मिळतील. प्रत्येक प्रयत्नामध्ये ९० सेकंदांचे अंतर ठेवावे लागेल.पैसे पाठवताना स्वीकारणाऱ्याचे नाव दिसणार : आता पैसे पाठवताना तुम्हाला नेहमी पैसे स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे नाव स्क्रीनवर दिसेल. यामुळे चुकीच्या खात्यावर पैसे जाण्याची शक्यता टाळण्यास मोठी मदत होईल.

बँकिंग सुधारणा कायदा आजपासून लागू

बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियममधील प्रमुख तरतुदी १ ऑगस्टपासून लागू होणार आहेत. बँकेचे प्रशासन सुधारणे, ठेवीदार आणि गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय सरकारी बँकांमधील लेखापरीक्षण (Audit) सुधारणे आणि सहकारी बँकांमधील संचालकांचा कार्यकाळ वाढवणे यासारख्या तरतुदींचाही यात समावेश आहे.

आता सरकारी बँकांना दावा न केलेल्या शेअर्स, व्याज आणि बाँडची रक्कम ‘गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी’मध्ये हस्तांतरित करण्याची परवानगी असेल.

२००० रुपयांवरील UPI व्यवहारांवर GST नाही

UPI वापरकर्त्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. २००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांवर वस्तू आणि सेवा कर (GST) लावण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. अलीकडेच अशा बातम्या समोर आल्या होत्या, ज्यानंतर २२ जुलै रोजी राज्यसभेत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की, जीएसटी कौन्सिलने UPI व्यवहारांवर जीएसटी लावण्याची कोणतीही शिफारस केलेली नाही.

व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात कपात

तेल विपणन कंपन्यांनी (Oil Marketing Companies) व्यावसायिक वापराच्या LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ३३.५० रुपयांची घट करण्यात आली असून, नवे दर १ ऑगस्ट २०२५ पासून लागू होतील. या कपातीनंतर दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत १६६५.०० रुपयांवरून १६३१.५० रुपये झाली आहे.मात्र, सर्वसामान्य ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. १४.२ किलोच्या घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला LPG सिलेंडरच्या दरांचा आढावा घेतला जातो, पण यावेळी बदल फक्त व्यावसायिक सिलेंडरपुरताच मर्यादित राहिला आहे.

error: Content is protected !!