मुंबई: पूर्वापार चालत आलेला पशुपालन व्यवसाय आता उत्पन्नाचे एक मजबूत साधन बनणार आहे. ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीचा हा एक प्रभावी मार्ग बनतोय. यामध्ये शेळीपालन हा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. कमी खर्च, जलद नफा आणि दूध, मांस, लोकर यांना बाजारपेठेत वाढती मागणी यामुळे हा व्यवसाय अनेक शेतकऱ्यांना आकर्षित करतो. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियान (National Livestock Mission – NLM) योजनेअंतर्गत आता 100 शेळ्यांच्या युनिटसाठी तब्बल 15 लाख रुपयांपर्यंतची सबसिडी मिळू शकते.
काय आहे NLM योजना?
NLM योजना ही 2014-15 साली सुरू झालेली केंद्र सरकारची उपक्रमशील योजना असून 2021-22 मध्ये तिच्यात सुधारणा करून ती आणखी परिणामकारक करण्यात आली. योजनेचा उद्देश ग्रामीण तरुण, शेतकरी, स्वयंसहायता गट (SHG), सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), संयुक्त दायित्व गट (JLG) यांना पशुपालनावर आधारित उद्योजकता विकसित करणे हा आहे.