कुडाळ : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय बौद्ध महासभा, गावशाखा नेरुर पंचशील नगर, पंचशील मंडळ नेरुर, समता नगर, आदर्श नगर यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान सन्मान कार्यकारी समिती २०२५ यांच्या नियोजनातून आणि ग्रामपंचायत नेरूर देऊळवाडा यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, आंबेडकर नगर येथे भव्य संविधान रॅली संपन्न झाली.
नेरुर गावच्या प्रथम नागरिक सरपंच भक्ती घाडीगावकर यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांचे स्वागत देखील करण्यात आले. या रॅलीचे मुख्य संकल्पक टी. एम. नेरुरकर यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला. सदर रॅलीची मुख्य संकल्पना त्यांची होती. त्याकरता त्यांचे सहकारी आणि त्यांनी सात दिवस काम केले.
सदर रॅलीत ग्रामपंचायत नेरूरचे विद्यमान सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच, माजी सदस्य सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य, आणि सर्व माजी पंचायत समिती सदस्य, पोलीस पाटील, सीआरपी, आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, तंटामुक्ती समिती, आशा स्वयंसेविका, प्रभाग संघप्रमुख, नेरुर गावातील सर्व महिला बचत गट, सामाजिक कार्यकर्ते, समविचारी संघटना आणि ग्रामस्थांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
रॅलीचे मुख्य आकर्षण संविधान चित्ररथ देखावा होता. यात संविधान पुस्तिकेची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा आणि भारतरत्न चिन्ह यांच्या देखील प्रतिकृती होत्या. राष्ट्रपती भवनातील राष्ट्रपतींचे सिंहासन आणि त्यामागील गौतम बुद्धांची मूर्ती हे प्रमुख आकर्षण या रॅलीत होते. तसेच डॉ. आंबेडकरांनी पैशाचे नियमन करण्यासाठी भारतीय चलन व्यवस्थेत मूलभूत बदल घडवून आणले. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रिझर्व बँक ऑफ इंडियाने तयार केलेल्या एक रुपयाच्या कॉइनची प्रतिकृती देखील फिरत्या स्वरूपात रॅलीचा केंद्रबिंदू होती.
संविधान रॅली डॉ. आंबेडकर पुतल्याजाल पोहचल्यानंतर स्थानिक जय भीम युवक मंडळाचे अध्यक्ष विद्याधर कुडाळकर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मंडळाने रॅलीचे स्वागत केले.
डॉ. आंबेडकर पुतळा येथे रॅलीला नगरपंचायत कुडाळच्या नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर, कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मगदूम सर, सहाय्यक गटविकास अधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, स्थानिक जय भीम युवक मंडळ, कुडाळ महिला मंडळ, शालेय विद्यार्थी आणि समविचारी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी रलीस संबोधित केले. रॅलीचे निवेदन विकी तांबे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नियोजन समितीचे सचिव हरिश्चंद्र कदम यांनी केले तर समितीच्या वतीने आभार मानण्यात आले.














