राजापूर: राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात होतं. मात्र, काल राजन साळवी यांनी प्रवीण दरेकर यांच्याबाबतही प्रतिक्रिया दिली होती. “मी निष्ठावंत शिवसैनिक आहे. पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारतात, तशा प्रकारचा प्रयत्न भाजप आणि अन्य कोणाचा असेल. पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करणं हे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाचे कर्तव्य असते. त्यामुळे त्यांनी भावना व्यक्त केल्या असतील. मी मतदार संघात काम करत आहे”, असं राजन साळवी म्हणाले होते. त्यामुळे पक्ष बदलाच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला होता. मात्र, आज पुन्हा एकदा राजन साळवींनी पक्ष बदलाचे संकेत दिले आहेत.
योग्य वेळी योग्य निर्णय घेणार
राजन साळवी म्हणाले, मागच्या काही दिवसांपासून माझ्या बाबतीत पक्ष प्रवेशाच्या बातम्या येत आहेत. माझ्या कार्यकर्त्यांनी देखील याबाबत मला विचारणा केली. त्यावेळी त्यांना मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईल असं सांगितलं आहे. लांजा असेल किंवा राजापूर या ठिकाणच्या पराभवाचा मंथन करत असताना भविष्याची दिशा काय याबाबत प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचं मी सांगितल्याचं साळवी यांनी म्हटलं आहे.
साळवी यांच्या पराभवाला कारणीभूत नेता कोण?
दरम्यान माझ्या पराभवाला वरिष्ठ कारणीभूत आहेत, असं साळवी यांनी म्हटलंय. त्यामुळे आता साळवी यांनी पक्ष बदलाचे संकेत दिल्याचं स्पष्ट झाला आहे. आज माझ्यावर अशी वेळ आली अशी इतर कार्यकर्त्यांवर देखील येईल असं सांगायलाही साळवी विसलेलेल नाहीत. त्यामुळे साळवी यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेला वरिष्ठ नेता कोण? राजन साळवी यांचा नेमका रोख कुणाकडे? याबाबत आता प्रश्न निर्माण झाले आहेत.













