परराज्यातील नौकांद्वारे मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागातर्फे कडक पावले

मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री नाम. नितेश राणे यांची ग्वाही

स्टीलच्या १५ गस्ती नौकांची ऑर्डर; ५ नौका महिनाभरात उपलब्ध होतील

आधुनिक गस्ती नौका, ड्रोनची सुरक्षा, एआयची यंत्रणा प्रभावीपणे राबवणार


नागपूर : परराज्यातील नौकांद्वारे होणारी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाने कडक पावले उचलली आहेत, अशी माहिती मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी विधानसभेत देताना मत्स्य विभागातर्फे स्टीलच्या १५ गस्ती नौकांची ऑर्डर देण्यात आली असून या महिन्यात ५ नौका उपलब्ध होतील. तसेच गेल्या वर्षभरात परराज्यातील नौकांवर वेळोवेळी कारवाई केलेली आहे. यामध्ये १८७६ कारवाई करण्यात आल्या आहेत. हा विषय आपण गांभीर्याने घेतलेला असून पुढील काळात आधुनिक गस्ती नौका, ड्रोनद्वारे सुरक्षा, एआयची यंत्रणा प्रभावीपणे राबवून परराज्यातील नौकांद्वारे होणारी मासेमारी रोखली जाईल, अशी ग्वाही ना. नितेश राणे यांनी यावेळी दिली.

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार भास्कर जाधव यांनी कोकणातील समुद्रात परराज्यातील नौकांद्वारे होणारी मासेमारी तसेच सुरक्षा व्यवस्था या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावर मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी सखोलपणे उत्तर दिले. यावेळी ते म्हणाले की, परराज्यातील नौकांद्वारे होत असलेली मासेमारी हा गंभीर विषय आहे. हा विषय मत्स्य व्यवसाय विभागाने गांभीर्याने घेतला असून आपल्याकडे असलेल्या गस्ती नौका लाकडी आहेत . यामुळे समोरच्या स्टीलच्या नौका असल्याचे दिसून आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रात त्यांना पकडायला जातात. तेव्हा अधिकाऱ्यांवर हल्ले देखील होतात.
यामुळे लाकडी नौकानी परराज्यातील नौकांना पकडणे शक्य नाही, हे मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलेले आहे. सध्या आपल्याकडे ५ गस्ती नौका आहेत. त्या पुरेशा नाहीत, याची आपल्याला कल्पना आहे.

यामुळे स्टीलच्या १५ गस्ती नौकांची ऑर्डर दिलेली आहे. या महिन्यात आपल्याला ५ नौका उपलब्ध होतील. तसेच जानेवारी दरम्यान ९ ड्रोनची सुरक्षा व्यवस्था सुरू केलेली आहे. यामुळे नौका कुठून येतात. तिचा नंबर देखील समजतो. तसेच आपल्या खात्यातील १०० टक्के अधिकारी प्रामाणिक नाहीत. काही समोरच्यांना मिळालेले असतात. अंतर्गत मदतीशिवाय ते आत मध्ये येऊ शकत नाहीत, असे देखील ना. नितेश राणे यांनी यावेळी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, आपण परराज्यातील नौकांवर वेळोवेळी कारवाई केलेली आहे. गेल्या वर्षभरात १८७६ कारवाया करण्यात आल्या असून या पुढील काळात परराज्यातील नौकांद्वारे होणारी मासेमारी रोखण्यासाठी कडक पावले उचलण्यात आली असून यामध्ये आधुनिक गस्ती नौका, ड्रोनची सुरक्षा यंत्रणा, एआयची यंत्रणा प्रभावीपणे राबवण्यात येईल, असे ना. राणे यांनी यावेळी शेवटी स्पष्ट केले.

error: Content is protected !!