दिवाळी सण साक्षात प्रबोधनाचा कुंभ…

शब्दांकन / सायली राजन सामंत, नेरुर, कुडाळ

दीपो नाशयते ध्वांतं धनारोग्ये प्रयच्छति,
कल्याणाय भवति एव दीपज्योती नमोस्तुते ||

तिमिराकडून तेजाकडे नेणाऱ्या आणि आपल्या सर्वांच्या आयुष्याला तेजोमय बनवणाऱ्या तसेच आरोग्य तथा धन प्राप्तीकडे मार्गक्रमण करण्याची आस देणाऱ्या अशा तेजोमय दिव्याला माझा शतशः प्रणाम.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि साधू संत महंतांच्या पदस्पर्शने पुनीत झालेल्या आपल्या महाराष्ट्राला विविध सणांची परंपरा लाभली आहे.विजयादशमीच सोनं लुटल्या नंतर सर्वांना दिवाळी सणाचे वेध लागतात.दिवाळी सण आणि दिव्यांच नात अनादी काळापासून चालत आलेल आहे.मित्रांनो दिपावली या शब्दाची मूळ उत्पती ही हिंदू धर्मातील आद्य भाषा म्हणजेच संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चराने झालेली आहे.दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे ओळ. याचा संपूर्ण अर्थ पाहिला गेलात तर दिव्यांची एका ओळीत केलेली रंजक रचनेची रांग म्हणजेच आपल्या सर्वांना हवी हवीशी वाटणारी दिवाळी अर्थात दीपोउत्सव.
रामायण युगात चौदा वर्षांच्या कालखंडात लंकाधीश रावणावर विजय प्राप्त करून जेव्हा प्रभू रामचंद्र आपली भार्या सीतामाई आणि प्राणप्रिय बंधू लक्ष्मण आणि सखा हनुमंत तसेच बलाढ्य वानरसेनेसहीत जेव्हा अयोध्येत पुन्हा आले तेव्हा साऱ्या प्रजेने अयोध्येत दीपोत्सव साजरा केला.याचे लिखित पुरावे पोथीपुराणात आजही सापडतात.सध्याच्या घडीला दीपोत्सव घरा घरात साजरा केला जातो. पण रामाचे आचार,विचार, संस्कार, कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व, सदाचार, सत्कर्म, संस्कारसंपन्नता याचा मात्र प्रकर्षाने समाजात अभाव दिसतो. मानवतेचा उद्धार व्हावा असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर त्रिकालज्ञानी रामाच्या सद्गुणांना प्रत्येकाने अंगीकारलं पाहिजे तरचं दीपोत्सवातील लक्ष दिव्यांच्या ज्योतींप्रमाणे प्रत्येकाच जीवन सुखकर आणि तेजोमय होईल. फक्त प्रत्येक माणसाने आचरणाच्या दिव्यात सदाचाराच सतत तेल घालत रहाणं गरजेचं आहे. दीपोत्सव प्रत्येक माणसाला नेमक हेच सांगत असतो.
चला आकाशदिवा लावुनी मानवतेचा… रेखाटूया कशीदार धर्मनिरपेक्षतेची सुबक आणि सुंदर रांगोळी चला सुसंकृतपणाच्या पेटऊयात पणत्या प्रेम आपुलकीची प्रत्येकाच्या हृदयी साजरी करूयात दिवाळी…
जगाच्या पोशिंद्या बळीराजाच्या दुधदुभत्यासाठी होणारा गाईचा उपयोग आणि शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षात घेऊन त्या गोधनाची केलेली कृतज्ञतापूर्वक पूजा म्हणजेच वसुबारस. हिंदु धर्मामध्ये गाय असो किंवा बैल असो यांना पवित्र आणि पूज्य स्थान आहे. पण अलीकडच्या काळात हिंदुधर्मात प्राणप्रिय अशा मानल्या जाण्याऱ्या या निष्पाप जनावरांची काही क्रूरकर्मी घटकांकडून सर्रास कत्तल केली जाते.असं नीच कृत्य करणाऱ्यांविरुद्ध आवाज उठवण्याची शपथ दीपावली सणातील तेजोमय दिव्याला साक्ष ठेऊन समाजातील प्रत्येक घटकाने घ्यावी तरच वसूबारशीच्या पूजेचं व्रत सार्थकी लागल्याच पुण्य तुमच्या पदरी पडेल हे मात्र निश्चित.याच दिवशी एक दिवा प्रज्वलीत करून तो दिवा दक्षिण दिशेला यमदेवतेसाठी लावला जातो कारण यमदेवतेला दक्षिण दिशेचा अधिपती म्हणून गणलं गेलं आहे. दिवाळीतील नरकचतुर्दशी हा पहिला दिवस.यादिवशीच्या मध्यरात्रीला नरकासुराला अग्नी देऊन दहन केले जाते. तसेच यादिवशी पहाटे उठून सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. ही परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे.
मित्रांनो सध्याच्या घडीला शासनाची लाडकी बहीण योजना घराघरात पोहोचलेली दिसते पण खरं सांगायचं झालं तर सध्याच्या घडीला घरा घरातील लाडकी बहीण मात्र मुळीच सुरक्षित नाही. त्यामुळेच तर गल्लोगल्लीत समाजातील विकृत क्रूरकर्मी नरकासुरांकडून स्त्रियांवरती वारंवार अत्याचार होताना दिसतात. समाजातील या विकृत क्रूरकर्मी नरकासुरांना अद्दल घडवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने तसेच विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधिंनी जशास तसं उत्तर देण्यासाठी संघटित होणं गरजेचं आहे. त्यासाठी कायद्यात कृष्णनितीचा अंमल आणावा लागेल. मग पहा स्त्रीकडे वाकड्या नजरेने पहाण्याची हिंमत कधीच कोणाची होणार नाही,हे खरं सत्य आहे. वर्षानुवर्ष चालत आलेल्या प्रथेप्रमाणे या दिवशी ज्या गावात आपण रहातो त्या गावातील ग्रामदेवतेच स्तवन करून घरासमोरील अंगणातील तुळशी वृंदावना समोर कारिटं फोडून गोविंदा गोविंदा असा मुखाने नामघोष करत त्यातील कडू रस चाखून त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रित येऊन गोडधोड फराळाचा आस्वाद घेताना प्रेम आपुलकी जिव्हाळ्याचं बंधन निभावतात.दिवाळी सणातील ही वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा आहे. आजही ती घरोघरी जपली जाते हे मात्र विशेष. या दिवसाच महत्व पटवून देणारी महत्वपूर्ण रहस्यमय कथा म्हणजे मित्रांनो यादिवशी श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदिशाळेतील सोळा सहस्त्र शंभर कन्यांची मुक्तता केली.तो हा दिवस. दृष्टांचा नाश आणि मुक्तीचा आनंद याचे प्रतीक म्हणून या दिवसाला फार महत्व आहे.लक्ष्मी पूजना दिवशी प्रत्येकजण घरोघरी तसेच व्यापारी बांधव आपल्या उद्योगधंद्याच्या ठिकाणी मोठ्या भक्ती भावाने आणि श्रद्धेन माता लक्ष्मीचे पूजन करतात. लक्ष्मी आपुल्या घरात यावी म्हणूनी सारे तिलाच पुजिती. पूजनासाठी फळे गोडधोड,फुले सुगंधाची. या पूजेचा थाट अलौकिक आणि अविस्मरणीय असाच असतो. पण सध्याच्या घडीला लक्ष्मीपूजना बरोबरच सरस्वती मातेचंसुद्धा पूजन करणं काळाची गरज आहे कारण ज्याच्या भाषेत सरस्वतीचा वास असेल त्या व्यक्तीच्या घरात निश्चितच लक्ष्मी वास्तव्यास राहील.मग पहा अवदसा पाठीला पाय लावून कायमची पळून जाईल.आणि नारायणाच्या कृपेने सुखं समृद्धी आरोग्याच्या रूपात खऱ्या अर्थाने तुमचा संसार बहरात येईल. आणि त्यानंतर संसाररुपी सौख्य पहाण्याचे भाग्य तुम्हाला खऱ्या अर्थाने प्राप्त होईल.हा वास्तव सत्य आणि सत्य आहे.
पाडवा म्हणजे दीपावली सणातील मंगलमय दिवसांपैकी एक दिवस. हा पाडवा पती पत्नीच्या अतूट प्रेमाचं प्रतीक दर्शवतो. या दिवशी पत्नी पतीला औक्षण करते. व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दामपत्याची पहिली दिवाळी ही पत्नीच्या माहेरी साजरी करतात.या दिवशी नवीन कपडे, दागिने, गाडी तसेच विविध वस्तू सऱ्हास विकत घेतल्या जातात कारण खरेदीसाठी हा शुभदिवस मानला जातो. हा पाडवा स्वतःच्या घरी किंवा पत्नीच्या माहेरी तुम्ही कुठेही साजरा करा पण औक्षणाच्या तबकडीतील त्या तेजोमय दिव्याला साक्ष ठेऊन प्रत्येक पतीपत्नीने आपण संसाररुपी रंगमंचावर कार्यरत असताना भविष्यकाळात आम्हा दोघांमध्ये संवाद साधण्याची वृत्ती संचारावी अशी परमेश्वराकडे हात जोडून प्रार्थना करावी.कारण संवादामुळे पतीपत्नीमध्ये नकळत वाद झाला तर तो वाद विकोपाला न जाता क्षणार्धात मिटतो आणि प्रेम,आपुलकी, जिव्हाळ्याचं बंधन निभावण्याची वृत्ती पती पत्नी या उभयतांमध्ये संचारते. आणि त्यामुळेच संसाररुपी नाटकाची खऱ्या अर्थाने गोल्डन जुब्ली होते. दिवाळी पाडवा हा पतीपत्नी उभयतांनी त्यासाठीच साजरा करायचा असतो.हे निदर्शनास आणून देणे क्रमप्राप्त आहे.उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते.ही पूजा श्रीकृष्णाच्या किंवा विष्णुच्या मंदिरात केली जाते.या पूजेला अन्नकूट असेही म्हणतात. बलिप्रतिपदा. पौराणिक युगात बळीराजा हा शेतकरी राजा होऊन गेला.हा बळीराजा जनहिताची नेहमीच काळजी घेत होता. त्याकाळात धनधान्याने कोठारे भरलेली असायची.पण दुर्दैव म्हणावे लागेल कारण सध्याच्या लोकशाहीच्या कालखंडात शेतात राबून धनधान्याचा पुरवठा करणारा माझा हा शेतकरी बळीराजा अनेक समस्यांच्या चक्रव्यूवात पुरता फसला आहे. माणसाने केलेल्या अतिक्रमणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल हा ढळला आहे. अवकाळी पाऊस,ढगफुटी, वादळी वारे, धरणी कंप, दूषित हवा, अपुरा पाण्याचा पुरवठा,अशा विविध नैसर्गिक आपत्यांना सध्याच्या घडीला शेतकरी बळीराजाला प्रतिवर्षी सामोर जावं लागत आहे. या सर्व नैसर्गिक समस्यांना सामोरं जाता जाता या शेतकरी बळीराजाचा जीव मात्र अगदी मेताकुटीला आला आहे. येवढंच नव्हे तर शेतकऱ्याने शेतात पिकवलेल्या मालाला बाजारात सध्याच्या घडीला पुरेसा भावही मिळत नाही. सरकारी योजनांच्या गाजराची पुंगी सध्याच्या घडीच्या राज्यकर्त्यांकडून नेहमीच वाजवली जाते. पण त्या योजनांच्या आर्थिक लाभापासून हा बळीराजा मात्र नेहमीच वंचित रहातो. पुराण युगातील शेतकरी बळीराजा मात्र खऱ्या अर्थाने सौख्य उपभोगत होता.कारण त्याकाळचे राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सक्षम होते.तो पुराणयुगातील बळीराजाने अनुभवलेला सौख्याचा काळ पुन्हा यावा असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर सध्याच्या राज्यकर्त्यांनी बळीराजाचे आर्थिकदृष्ट्या तारणहार बनणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. तशी मती सध्याच्या राज्यकर्त्यांना परमेश्वराने द्यावी अशी प्रार्थना प्रत्येकाने बालिप्रतिपदेच्या दिवशी करण गरजेचं आहे. तरच बलिप्रतिपदेच्या पूजेच पुण्य प्रत्येकाच्या वाट्याला येईल.हे मात्र निश्चित.भाऊबीज ही भावा बहिणीच्या अतूट नात्याचं प्रतीक दर्शवते. हिंदु धर्माच्या राठीत द्रौपदी स्वयंवराच्यावेळी कृष्णाने आपली बहीण द्रौपदीला साड्या पुरवल्याचा वास्तव सगळ्यांनाच माहिती आहे. ती प्रासांगिकता मात्र सध्याच्या कलियुगात हवेत विरून गेलेली दिसते. अहो त्यामुळेचं तर वडिलोपार्जित संपतीच्या विभाजनावरून बहीणभावांमध्ये घरा घरात तंटे विकोपाला गेलेले दिसतात. सध्याच्या घडीला भावाची परिस्थिती गरीब असेल आणि बहिणीची घरची परिस्थिती श्रीमंत असेल तर प्रसंगाचं गांभीर्य जाणून बहिणीने भावाला आर्थिक मदत करण्याचे सत्कर्म कराव किंवा भावाची आर्थिक परिस्थिती श्रीमंत असेल आणि बहिणीची आर्थिक परिस्थिती हालाखीची असेल तर भावाने बहिणीला आर्थिक मदत करण्याचे सत्कर्म करावे , बहीण असो किंवा भाऊ असो दोघांचीही परिस्थिती सदन असेल तर दोघांनीही सुवर्णमध्य साधून वडिलोपार्जित संपत्ती विभागून घ्यावी.तरच बहीण भावाच नातं सध्याच्या घडीला खऱ्या अर्थाने तंटामुक्त होईल. हे सत्य नाकारून चालणार नाही. भाऊबीज साजरी करण्याचा नेमका हाच तर हेतू आहे. याचे लिखित पुरावे आजही पोथी पुराणात सापडतात भाऊबीजेची प्रथा आगळी,भावा बहिणींनी ती जपून ठेवावी अशा प्रथेमुळे शान वाढते हिंदू धर्माची. दिवाळी सणाची सांगता होते ती तुळशी विवाह सोहळ्याने.मग धांदल तुळशी लग्नाची, जमुनी सारे तीला सजवती, विधिपूर्वक विवाह लावती विष्णुदेवाशी.हिंदू धर्मात मंदिराच्या कळसाला आणि अंगणातील तुळशीला पवित्र मानलं जात.संतयुगात या अंगणातील तुळशी वृंदावनाला घालून पाणी पंढरपूरात गेली होती जनी.अशा आख्यायिकेचं कीर्तनकार, प्रवचनकार निरूपण करताना दिसतात. विष्णू पुराणातील वृंदा जलधर हा कथासार प्रत्येकाच्या वाचनात आला असेल.विष्णुभक्त वृंदा ही पतीव्रता होती. तिच्या विष्णुभक्तीमुळे तिचा पती अत्याचारी जलधर याला पराभूत करणे देवांनाही अशक्यप्रिय होऊन गेले होते. त्यावेळी भगवान विष्णुने संधी साधून प्रत्यक्ष जलधराचे रूप धारण करून वृंदेच पातीव्रत्य भ्रष्ट केले. त्यामुळेचं जलधराला संपवण देवांना शक्य झाले. पण ही वार्ता वृंदेला समजताच.वृंदेने विष्णुला तुला पत्नी विरहाचा आघात सोसावा लागेल असा शाप दिला.त्यामुळेच विष्णुची राम अवतारात लंकाधीश रावणाने पत्नी सीता हिचे हरण केल्यामुळे विष्णूरूपातील रामाला पत्नीच्या विरहाचा आघात सहन करावा लागला. तसेच वृंदेच्या शापामुळे विष्णूचा साक्षात दगड झाला.त्या दगडालाच शाळीग्राम असे म्हणतात. त्या शापातून मुक्त होण्यासाठी भगवान विष्णुना खडतर प्रसंगांना सामोरे जावे लागले.त्यानंतर भगवान विष्णुना शापातून मुक्ती प्राप्त झाली. ते मूळ रूपात स्तीर झाले. जलधराचे शीर आपल्या मांडीवर घेऊन वृंदेने अग्नित प्रवेश केला. ती जळून खाक झाली. त्यानंतर वृंदा आणि जलधराला त्यांच्या मूळ रूपात मुक्ती प्राप्त झाली.सागर पुत्र जलधर हा पूर्वजन्मीचा विष्णुचा अवतार आणि वृंदा ही लक्ष्मीचा अवतार.ती वृंदा म्हणजेच लक्ष्मी.या कलियुगात तुळशीच्या रूपात प्रत्येकाच्या अंगणात बहरलेली दिसते.आणि जलधर म्हणजेच विष्णूचा अवतार.अहो म्हणूनच तर तुळशी विवाहाच्या दिवशी दिंड्याचा गोविंदा म्हणजेच नवरा बनवून त्या नवऱ्याचा तुळशी सोबत विधीपूर्वक विवाह लावला जातो आणि याचं तुळशीविवाह सोहळ्या बरोबर दीपावली सणाची सांगता होते.
या संपूर्ण दिवाळी सणाच्या पवित्र अशा संकल्पनेत तुम्ही आम्ही सर्वजण एकरूप होऊयात.आनंद स्वतः घेऊया आनंद इतरांना देऊया.आनंद साजरा करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे.पण तो आनंद साजरा करताना मात्र माणुसकीचा धर्म प्रत्येकाने पाळला पाहिजे.मित्रहो परिस्थिती समाजातील प्रत्येक घटकाला हतबल करत असते.ते प्रत्येकाच पूर्वसंचित असतं. त्यामुळेच त्या परिस्थितीला प्रत्येकाला सामोरं जाव लागतं.हे त्रिवार सत्य आहे. म्हणूनच तर मी हात जोडून तुम्हाला नम्रविनंती करते की या वर्षीच्या दिवाळीला लागणारे दिवे म्हणजेच पणत्या, विविध रंगांची रांगोळी, दिवाळी सणाचा गोडवा वाढवणारा रुचकर फराळ, आकाशकंदील,सुगंधी उटणे,सजावटीच साहित्य अशा विविध वस्तू मोठ मोठ्या मॉल मध्ये जाऊन तुम्ही विकत न घेता गोरगरीब आर्थिकदृष्ट्या गरजू व्यापाऱ्यांकडून त्या सर्व वस्तू विकत घ्या. कारण तुम्ही विकत घेतलेल्या वस्तूंमुळे त्या गरीब व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद फुलकीत होईल.कारण ते आर्थिकदृष्ट्या गरजू असलेले व्यापारी श्रीमंत होण्यासाठी नाही हो कमवत, तर ते दोन वेळेचं अन्न मिळावं म्हणून कमवत असतात.तुम्ही विकत घेतलेल्या वस्तूंमुळे त्या गरीब व्यापाऱ्यांना दोन वेळचं अन्न पोटभर जेवता येईल आणि या दिवाळीला अन्नदान केल्याच्या पुण्याच सौख्य परमेश्वर व्याजासकट तुमच्या घरी पाठवून देईल.कारण हिंदुधर्मात अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं गेलं आहे.तेचं पवित्र अन्नदान तुमच्याकडून केल गेलं तरचं संपूर्ण दिवाळी सणाचा संकल्प सिद्धिस गेला अस तुम्हा आम्हाला म्हणता येईल. मित्रहो तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *