कुडाळ/प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ.स्नेहा नाईक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. वैभव नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक गोष्टी व आपली अवैध मालमत्ता लपवली असावी, त्यामुळे आपला अर्ज बाद होऊ शकतो अशी भीती त्यांना असल्यामुळे आपली पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवला आहे. अशी टीका भाजपचे कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी केली आहे.
वास्तविक आमदार वैभव नाईक यांनी डमी उमेदवार म्हणून या भागात गेली अनेक वर्ष ठाकरे सेनेबरोबर काम करणारे संजय पडते, अमरसेन सावंत यांच्यासारखे अनेक जेष्ठ पदाधिकारी आहेत, त्यापैकी कोणाचाही अर्ज दाखल करून ठेवला असता तर उमेदवार म्हणून त्यांना कदाचित संधी मिळाली असती. पण शेवटी आमदार वैभव नाईक यांनी आपला स्वार्थ बघितलाच आणि आपल्या पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवला. दुसऱ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या वैभव नाईक यांची ही घराणेशाही नाही का हे त्यांनी आपल्याच मनाला विचारावं. महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मिळत असलेला उत्तम प्रतिसाद पाहून वैभव नाईक सैरभैर झालेले आहेत. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी या विधानसभेतून त्यांना पराभव आणि सन्मा. निलेशजी राणेसाहेब यांचा विजय निश्चित असल्याचे भाजपचे कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी म्हटले आहे.