सिने अभिनेते मयुरेश अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती
महिलांसाठी रंगला खेळ झी मराठीचा
कणकवली – तालुक्यातील हरकुळ बुद्रुक गावात आईनतळवाडी, भवानी मंदिर परिसरात ‘झी मराठी’ चा मनोरंजनाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न झाला. रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या निमंत्रणातून आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमाला सिने अभिनेते मयुरेश अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. परिसरातील रसिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
‘आवडलंय तेच निवडायचं ठरलंय, प्रेक्षकांना जमलंय!’ या उत्साहपूर्ण वातावरणात झी मराठीवरील आपल्या लोकप्रिय कलाकारांना निवडायची संधी ही हरकुळ बुद्रुक गावातील महिलांना लाभली. या मिळालेल्या संधीमुळे महिला, युवक तसेच कुटुंबांसह आलेल्या रसिकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
यावेळी प्रथमतः सिने अभिनेते मयुरेश अभ्यंकर व त्यांच्या सोबत आलेल्या संपूर्ण झी मराठी टीम चे हरकुळ वासियांनी स्वागत केले. झी मराठीवर दिसणाऱ्या आपल्या आवडत्या कलाकारांन विषयी महिलांना प्रश्न विचारण्यात आले व विविध गेम देखील खेळण्यात आले. यामध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना झी मराठी परिवाराकडून भेटवस्तू देखील देण्यात आली. मोफत प्रवेशामुळे कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली आणि भवानी मंदिर परिसर अक्षरशः रसिकांच्या उपस्थितीने फुलून गेला.
कोकणातील ग्रामीण भागात अशा प्रकारचा मनोरंजनाचा विशेष कार्यक्रम आयोजित झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. ‘झी मराठी’च्या कलाकारांची मांदियाळी आणि रसिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हरकुळ बुद्रुकमध्ये रंगलेला हा सोहळा सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरला.
यावेळी रोटरी क्लब चे डॉ. अमेय मराठे, वर्षा बांदेकर, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत परब, ग्रामपंचायत सदस्य मंजुषा पारकर, नारकर गुरुजी गावातील ग्रामस्थ सुधीर खोचरे, लक्ष्मण खोचरे, बाबुराव खोचरे, बुवा सुधाकर परब, बुवा राजू खोचरे आदी गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Subscribe










