मानसी नाईक यांच्या हस्ते ‘मिस कॉल’ गाण्याचे संगीत अनावरण; मिष्टी भवार यांचे संगीत क्षेत्रात पदार्पण

अभिनेत्री मानसी नाईक यांच्या हस्ते ‘मिस कॉल’ या नव्या मराठी गाण्याचे संगीत अनावरण झाले. मिष्टी भवार यांनी या गाण्याद्वारे संगीत क्षेत्रात पदार्पण केले.

मुंबई : क्रिएटिव्ह आई प्रॉडक्शन्सच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या ‘मिस कॉल’ (Miss Call) या नव्या मराठी गाण्याचा संगीत अनावरण सोहळा अभिनेत्री मानसी नाईक यांच्या हस्ते मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला मनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे, या गाण्याच्या निमित्ताने प्रसिद्ध बॉलिवूड कोरिओग्राफर मिष्टी भवार यांनी संगीत क्षेत्रात नवे पाऊल टाकले आहे.


मिष्टी भवार यांनी यापूर्वी मनोरंजन क्षेत्रातील विविध प्रकल्पांमध्ये कोरिओग्राफीसाठी काम केले आहे. Netflixच्या ‘Sacred Games’ या वेबसीरिजसह ‘Monkey Man’ या चित्रपटाशीही त्यांचा कामाचा संबंध राहिला आहे. आगामी ‘DGP Kashmir’ चित्रपटासाठीही त्या अभिनेत्री डेझी शाह यांच्यासोबत काम करत असल्याची माहिती देण्यात आली.


मिष्टी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात फराह खान यांच्यासह अन्य नामवंत कोरिओग्राफर्सच्या सहाय्यक म्हणून केली. संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’ चित्रपटातील ‘नगाडा संग ढोल’ आणि ‘लहू मुँह लग गया’ या गाण्यांसाठी त्यांनी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम केले आहे.


या संगीत अनावरण सोहळ्याला मिष्टी यांच्या कथ्थक गुरु डॉ. स्मृतीताई तळपदे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी मिष्टी यांच्या कलाप्रवासाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. फिल्म कलाकार आणि डान्स टीचर रामेश्वर पळसकर हे देखील खास संभाजीनगरहून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले.


‘मिस कॉल’ या गाण्यात मिष्टी भवार आणि सतीश पाटील यांची जोडी पाहायला मिळणार आहे. गाण्याला मिलिंद मोरे यांनी संगीत दिले असून, कविता राम यांनी गायन केले आहे. गाण्याचे सिनेमॅटोग्राफीचे काम अजय घाडगे यांनी केले आहे.
अभिनेत्री मानसी नाईक यांनी ‘मिस कॉल’च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. गाण्याची कोरिओग्राफी, गीतरचना आणि चित्रीकरणाचे कौतुक करत त्यांनी मिष्टी भवार यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच भविष्यात मिष्टी यांनी आपल्यासाठी कोरिओग्राफी करावी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.


मिष्टी भवार यांनी आपल्या संगीत क्षेत्रातील पदार्पणामागे आई-वडिलांचा मोठा पाठिंबा असल्याचे सांगितले. त्यांची आई केशर भवार यांनी क्रिएटिव्ह आई प्रॉडक्शन हाऊस सुरू केले असून, ‘मिस कॉल’ची निर्मिती ही आपल्या आईकडून मिळालेली खास भेट असल्याची भावना मिष्टी यांनी व्यक्त केली.


क्रिएटिव्ह आई प्रॉडक्शनच्या निर्मात्या केशर भवार यांनी प्रॉडक्शनकडे जाहिरात, व्हिडिओ आणि शॉर्ट फिल्मसह विविध प्रकारच्या निर्मितीसाठी टीम उपलब्ध असल्याचे सांगितले. ‘मिस कॉल’ या गाण्याला प्रेक्षकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
‘मिस कॉल’ हे मिष्टी भवार यांच्या कलाप्रवासातील नवे पर्व ठरले आहे. गाण्याचा अधिकृत व्हिडिओ Kreative आई Productions या YouTube चॅनेलवर पाहता येणार आहे.
‘मिस कॉल’ गाण्याचा अधिकृत व्हिडिओ :

YouTube player

error: Content is protected !!