सोबत हॉटेल मालकाचा मोबाईल देखील पळवला
पोलिसांनी पाठलाग करत संशयितांना खारेपाटण येथून घेतले ताब्यात
कुडाळ : शहरानजिकच्या मुंबई गोवा महामार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवण करून बिलाची रक्कम न भरता हॉटेल मालकाचा मोबाईल घेऊन कारमधून रत्नागिरीच्या दिशेने पसार झालेल्या पाच युवकांना पोलिसांनी अवघ्या काही वेळात खारेपाटण येथे नाकाबंदी करून ताब्यात घेतले. डायल ११२ वरून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्परता दाखवत ही कारवाई केली.
ग्रुपने फिरण्यासाठी आलेल्या पाच युवकांनी कुडाळ शहराजवळील एका हॉटेलमध्ये सोमवारी दुपारी जेवण केले. जेवण झाल्यानंतर त्यांनी बिलाची रक्कम न भरता हॉटेल मालकाचा काऊंटरवरील मोबाईल घेऊन कारने पळ काढला. हा प्रकार लक्षात येताच हॉटेल मालकाने तातडीने डायल ११२ वर संपर्क साधून कुडाळ पोलिसांना माहिती दिली. लागलीच पोलिस कॉन्स्टेबल शांताराम वराडकर यांनी सदर हॉटेलजवळ धाव घेत माहिती घेतली. माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी यंत्रणा सक्रिय करत संबंधित वाहनाचा शोध सुरू केला. तसेच वायरलेसद्वारे सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा संदेश देण्यात आला. त्यानुसार खारेपाटण येथे पोलिसांनी नाकाबंदी करून संशयित कार अडवली आणि त्यामधील पाच युवकांना ताब्यात घेतले. खारेपाटण पोलिसांनी याबाबत कुडाळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर सायंकाळी पुढील कार्यवाहीसाठी कुडाळचे सहा. उपनिरीक्षक ममता जाधव, हवालदार संजय कदम, नारायण गंगावणे आदींचे पथक खारेपाटणकडे रखाना झाले. या प्रकरणी संबंधित युवकांना कुडाळ पोलीस ठाण्यात आणून त्यांची अधिक चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.


Subscribe










