श्री. देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे मुली व महिलांसाठी स्वरक्षणासाठी (कराटे) प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : माजी उपसरपंच सौ. रश्मी देवेंद्र नाईक यांच्या संकल्पनेतून चेंदवण गावात मुली व महिलांसाठी प्रथमच सेल्फ डिफेन्स (कराटे) प्रशिक्षण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आजच्या काळात महिलांवर व मुलींवर वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर स्वसंरक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.

या प्रशिक्षणाचा शुभारंभ श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे शनिवारी सकाळी ९ वाजता करण्यात आला. कार्यक्रमास एकूण ३५ ते ४० मुले उपस्थित होती. तसेच महिला, युवती आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक व कराटे प्रशिक्षक श्री महादेव वेळकर (रा. पाट, कुडाळ) यांनी कराटेचे महत्त्व विषद केले. त्यांनी सांगितले की, कराटेमुळे केवळ शारीरिक क्षमता नव्हे तर बौद्धिक क्षमतेतही वाढ होते. कराटे क्षेत्रात प्राविण्य मिळवून एखादा मुलगा किंवा मुलगी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांपर्यंत पोहोचल्यास दहावीच्या परीक्षेत अतिरिक्त गुणांचा लाभ मिळतो आणि त्याचा विद्यार्थ्यांना शैक्षणिक फायदा होतो. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, कराटे म्हणजे फक्त मारामारी नव्हे; तर संकटाच्या वेळी स्वतःचे संरक्षण कशा पद्धतीने करावे हे शिकवणारे प्रभावी प्रशिक्षण आहे. त्यामुळे प्रत्येक मुलगा आणि मुलीने कराटे प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गवस मॅडम यांनी केले. श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक धरणे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास मा. माजी उपसरपंच सौ. रश्मी नाईक मॅडम, संस्था समिती सदस्य संजय नाईक, युवा सामाजिक कार्यकर्त्या कु. साक्षी चेंदवणकर, संजना जुवेकर, जान्हवी गोरुले तसेच विद्यालयाचे शिक्षक, आणि पालक उपस्थित होते.
या उपक्रमामुळे गावातील मुली व महिलांमध्ये स्वसंरक्षणाची जाणीव, आत्मविश्वास आणि सक्षमीकरणाची भावना अधिक दृढ झाल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!