राहत्या घरी गळफास घेऊन संपवले जीवन
आईने पाहताच फोडला टाहो
ओरोस : ओरोस-सावंतवाडा भागात राहणाऱ्या एका २६ वर्षांच्या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची खळबळजनक घटना गुरुवारी समोर आली आहे. किशोर सुरेश राणे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे, गेल्या एका आठवड्यात या परिसरात घडलेली ही दुसरी-तिसरी आत्महत्या असल्याने स्थानिक नागरिकांमधून मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राणे कुटुंब हे मूळचे ओरोस जिजामाता चौक परिसरातील आहे. मात्र, सध्या किशोर आणि त्याची आई ओरोस-सावंतवाडा येथे भाड्याच्या/एका घरात राहत होते. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आई आणि किशोर हे दोघेच या घरात वास्तव्यास होते. किशोर ओरोसमध्येच एका ठिकाणी काम करत होता, तर त्याची आई मजुरी करून घर चालवत होती. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे आई कामावर निघत असताना, किशोरने तिला घराच्या दरवाजाला बाहेरून कडी-कुलूप लावून जाण्यास सांगितले. “घरात दुसरी चावी आहे, त्यामुळे मला बाहेर पडायचे असल्यास मी निघेन,” असे सांगून त्याने आईला आश्वस्त केले होते. त्यामुळे आई बाहेरून कडी लावून कामावर निघून गेली.
दिवसभर किशोर घरात एकटाच होता. सायंकाळी आई कामावरून परतली आणि तिने दरवाजा उघडून आत प्रवेश केला, तेव्हा किशोर गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. हा धक्कादायक प्रकार पाहताच आईने मोठ्याने टाहो फोडला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी रुपेश नाईक, शैलेश सोन्सूरकर, एडवर्ड बुतेलो, तन्मय साळगावकर आणि प्रदीप नाईक यांनी घटनेचा पंचनामा केला. किशोरने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे स्पष्ट कारण अद्याप समोर आले नसून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Subscribe










