दोघेही आढळले पुण्यामध्ये
कुडाळ पोलिसांची कामगिरी
१९ वर्षीय युवती प्रियकरासोबत घरातून निघून गेल्याची घटना समोर
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील १९ वर्षीय युवती घरातून निघून आपल्या प्रियकरासोबत पुण्याला गेल्याची घटना समोर आली. चार दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेत युवतीच्या पालकांनी कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या ४८ तासांच्या आत युवती व तिच्या प्रियकराचा पुणे-स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीतून शोध घेण्यात यश मिळविले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी पोलीस अधिकारी जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. सुरुवातीला युवती व तिच्या प्रियकराचे दोन्ही मोबाईल फोन स्विच ऑफ असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. त्यातच संबंधित युवक कोण आहे, तो नेमका कुठला आहे, याची कोणतीही माहिती युवतीच्या पालकांकडे नव्हती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीने पोलिसांनी जलद हालचाली सुरू केल्या.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. तपासादरम्यान संबंधित युवक व युवती हे पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार कुडाळ पोलिसांनी संबंधित युवकाची माहिती व त्याचा मोबाईल क्रमांक स्वारगेट पोलिसांकडे पाठविला. त्यानंतर स्वारगेट पोलिसांनीही तातडीने शोधमोहीम राबवत दोघांनाही ताब्यात घेतले. कुडाळ व स्वारगेट पोलिसांमधील प्रभावी समन्वयामुळे अवघ्या ४८ तासांत युवती व तिच्या प्रियकराचा शोध लागला. माहिती मिळताच युवतीचे पालक स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल झाले. मात्र, पोलिसांसमोर युवती आणि तिच्या प्रियकराने आपण दोघेही परस्पर संमतीने एकत्र आलो असून लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट सांगितले. दोघेही आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
या संपूर्ण कारवाईत कुडाळ पोलिसांनी दाखविलेली तत्परता, तांत्रिक तपासाचा प्रभावी वापर आणि स्वारगेट पोलिसांशी साधलेला समन्वय यामुळे संभाव्य अनुचित घटना टळली असून संबंधित युवतीचा सुरक्षित शोध घेण्यात यश आल्याने पालकांनीही पोलिसांचे आभार मानले.


Subscribe








