कणकवलीत व्यापारी शिष्टमंडळाची नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट

नव्या संकुलाबाबत तातडीने कार्यवाहीचे निर्देश

कणकवली : अप्पासाहेब पटवर्धन चौक परिसरातील नगरपंचायत कणकवलीच्या मालकीच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या नव्या व्यापारी संकुलाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ व्यापारी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी शिष्टमंडळाने आज नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेतली.

यावेळी नगरपंचायतीच्या मालकीच्या पक्क्या इमारतीत तसेच बाजूला असलेल्या सुमारे ६ बाय ८ फुटांच्या गाळ्यांमध्ये गेली अनेक वर्षे भाडे तत्त्वावर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विविध मागण्या आणि अडचणी नगराध्यक्षांसमोर मांडण्यात आल्या. या ठिकाणी मागील १० ते १५ वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीही शिष्टमंडळात सहभागी झाले होते.

व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत नव्या संकुलासंदर्भातील प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच या विषयावर विलंब न करता आवश्यक ती कार्यवाही कडक शब्दांत करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या शिष्टमंडळात बंडू कोदे, अनिल मेस्त्री, संतोष महाजन, जमिल कुरेशी, इजाज काजी, शेखर बाणे, महेश वायंगणकर, बाबुराव घाडीगावकर, प्रभाकर कदम आणि सुभाष उबाळे यांच्यासह अन्य व्यापारी उपस्थित होते. व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघेल, अशी अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली.

error: Content is protected !!