गडमठच्या चित्रकार श्रुती सुतारची वारकरी परंपरेला सर्जनशील अभिवादन..
तुळशीदास कुडतरकर / कणकवली
आषाढी एकादशीच्या निमित्ताने वैभववाडी तालुक्यातील युवा चित्रकार श्रुती संतोष सुतार यांनी कॅनव्हासऐवजी वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या वीणेवर भगवान श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांची आकर्षक चित्रे साकारून भक्ती, संस्कृती आणि कलेचा अनोखा संगम घडविला आहे. त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतीचे वारकरी, कला रसिक आणि नागरिकांकडून कौतुक होत आहे.
वारकरी संप्रदायात वीणा ही केवळ एक वाद्य नसून भक्ती, नामस्मरण आणि अध्यात्माचे पवित्र प्रतीक मानली जाते. गळ्यात वीणा धारण करून “राम कृष्ण हरी”चा अखंड गजर करणाऱ्या वारकऱ्यांच्या भावविश्वाला साकार रूप देण्याचा प्रयत्न या कलाकृतीतून करण्यात आला आहे. विठ्ठलभक्तीचे प्रतीक असलेल्या वीणेवर विठ्ठल-रुक्मिणी यांचे चित्र रेखाटून आषाढी एकादशीचा भक्तिमय संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न श्रुती सुतार यांनी केला आहे.
ही कलाकृती ॲक्रेलिक रंगांच्या माध्यमातून साकारण्यात आली असून भगवान श्री विठ्ठलाच्या चित्राची उंची ६.५ इंच, तर माता रुक्मिणीच्या चित्राची उंची ५.५ इंच आहे. या कलाकृतीद्वारे सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतानाच भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि भक्तीचा संदेश जपण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
श्रुती सुतार यांची सूक्ष्म चित्रकलेतील ही पहिलीच कलाकृती नसून यापूर्वी त्यांनी रुईच्या पानावर हनुमान, गंधगोळीवर विठ्ठल, तुळशीच्या पानावर श्रीकृष्ण, मोरपिसावर श्रीकृष्ण, सूक्ष्म टिकलीवर नऊ दुर्गा तसेच भारतरत्न आशा भोसले यांचे सूक्ष्म चित्र साकारून आपल्या कुंचल्याचे वेगळेपण सिद्ध केले आहे. त्यांच्या कलाकृतींमध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विषयांना विशेष स्थान असल्याचे दिसून येते.
आषाढी एकादशीच्या पवित्र वातावरणात साकारलेली ही वीणेवरील विठ्ठल-रुक्मिणीची कलाकृती वारकरी भक्ती आणि भारतीय कलासंस्कृतीचा सुंदर मिलाफ म्हणून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.






Subscribe









