भारतीय जनता पार्टी सर्व व्यापाऱ्यांच्या पाठीशी
राजापूर : शहरात भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे कारण पुढे करत आठवडा बाजार मागे हटवून व्यापारी, ग्राहक आणि नागरीक यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न प्रशासन आणि लोकप्रतिनिधी करत आहेत. मात्र या गुरूवारी भरणारा आठवडा बाजार पूर्वीप्रमाणेच भरेल भारतीय जनता पार्टी सर्व व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभी राहिल, असा इशारा भाजपाचे ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस अनिल करंगुटकर व सुशांत मराठे यांनी दिला आहे. या संदर्भात भाजपा शिष्टमंडळाने मंगळवारी सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच राजापूर पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन चर्चा केली. यामध्ये भाजपा तालुका अध्यक्ष मोहन घुमे, विद्यमान नगरसेविका सुयोग जठार, माजी उपनगराध्यक्ष शीतल पटेल, सौ श्रुती ताम्हणकर, सुधा चव्हाण आदींचा समावेश होता.
शहरातील शिवाजीपथ मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून आठवडा बाजार भरत आहे. मात्र एका व्यक्तीच्या वादावरून आणि सांगण्यावरून हा आठवडा बाजार मागे हटविण्याचे प्रयत्न प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे. मात्र लोकप्रतिनिधी खरे कारण न सांगता वाहतूक कोंडीचे कारण पुढे करत असल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. वैशंपायन गुरूजी पुलापासून ते नवजीवन हायस्कूलपर्यंत आठवडा बाजार भरतो. मात्र प्रशासनाला केवळ वैशंपायन गुरूजी पुलापासून गणेश घाटापर्यंत वाहतूक कोंडी झालेली दिसते, त्याच्या पुढे वाहतूक कोंडी होत नाही का? असा सवालही भाजपा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
शिवाजीपथ मार्गावर बसणाऱ्या मच्छीविक्रेत्यांमुळे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय जवाहर चौक ते जकातनाका दरम्यान पोलीस स्थानक, कोर्ट, जवाहर चौक या परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होते, ती प्रशासनाला दिसत नाही. केवळ एक दिवस भरणाऱ्या आठवडा बाजारातील वाहतूक कोंडी कशी दिसते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आठवडा बाजारातील व्यापारी, ग्राहक, नागरीक यांना जाणून बुजून त्रास देण्याचा हा प्रयत्न असून तो हाणून पाडला जाईल, या गुरूवारचा आठवडा बाजार पूर्वीप्रमाणे भरेल, त्या करीता भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते स्वतः आठवडा बाजारात उपस्थित राहून व्यापाऱ्यांना पाठींबा देतील असेही या शिष्टमंडळाने सांगितले.
दरम्यान याबाबत खासदार नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांची भेट घेवून आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांच्या व्यथा मांडणार असल्याचेही या शिष्टमंडळाने सांगितले.
, आधी मंडळींनी भेट घेतली


Subscribe










