यशदा पुणे येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान (RGSA) अंतर्गत नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच सर्व सदस्यांनी प्रशिक्षणात घेतला एकत्रित संवाद

पुणे : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे दि. २० ते २२ जुलै २०२६ या कालावधीत राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान (RGSA) अंतर्गत नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी यशदाचे महासंचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी देखील उपस्थित रहात सर्वांशी संवाद साधला यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, सत्र संचालिका रेश्मा होजगे उपस्थित होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, वित्त व बांधकाम समिती सभापती संतोष साटविलकर, शिक्षण व आरोग्य समिती सभापती प्रितेश राऊळ, महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा नारकर, समाजकल्याण समिती सभापती रुहिता तांबे तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच सर्वच जिल्हा परिषद सदस्यांनी एकत्रितपणे या प्रशिक्षणात सहभाग घेतला, ही बाब उल्लेखनीय ठरली.
या प्रशिक्षणादरम्यान जिल्हा परिषद कामकाज, प्रशासनिक प्रक्रिया, ग्रामविकास योजना, पंचायत राज व्यवस्थेचा मागोवा, ७३ वी घटनादुरुस्ती, विकासाची संकल्पना, शाश्वत विकास ध्येय (SDGs) व त्यांचे स्थानिकीकरण, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, वित्तीय बाबी, जिल्हा परिषद अंदाजपत्रक, उत्पन्नाची साधने, समित्यांचे वित्तीय व प्रशासकीय अधिकार, लेखासंहिता तरतुदी, खरेदी प्रक्रिया, नेतृत्वगुण विकास, भौगोलिक माहिती प्रणाली (GIS), तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत विकास आराखडे (DPDP, BPDP, GPDP) यांसारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मतदारसंघनिहाय विकास कामांचा आराखडा तयार करणे, जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी, सभा कामकाज, कामकाजामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहितीही देण्यात आली.

यावेळी मार्गदर्शक अधिकारी व प्रशिक्षकांनी विविध विषयांवर सखोल माहिती देत सदस्यांच्या शंकांचे समाधान केले.
या प्रशिक्षणामुळे जिल्हा परिषद सदस्यांची कार्यक्षमता वाढून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणास मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

error: Content is protected !!