राजकारणात सत्तेची खुर्ची अनेकांना लाभते, पण त्या खुर्चीचा मान वाढवणारे नेतृत्व विरळच असतात. काही नेते फक्त पदे भूषवतात, तर काही आपल्या कर्तृत्वाने त्या पदालाच नवी प्रतिष्ठा प्राप्त करून देतात. असेच दूरदृष्टी, अभ्यासपूर्ण निर्णयक्षमता, विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन आणि जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन आपल्या कार्यशैलीने जनतेच्या मनात विश्वासाचे अढळ स्थान निर्माण करणारे महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री मान.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस!
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देत, प्रशासनात गतिमानता आणत आणि जनतेचा विश्वास कृतीतून जपत त्यांनी नेतृत्वाची एक वेगळी उंची गाठली आहे. विकास, पारदर्शकता, कार्यक्षम प्रशासन आणि धाडसी निर्णयक्षमतेचा संगम असलेले त्यांचे नेतृत्व आज कोट्यवधी महाराष्ट्रवासीयांसाठी प्रेरणा आणि विश्वासाचे प्रतीक बनले आहे. महाराष्ट्रातील जनतेने सर्वाधिक काळ सेवेत ठेवून आपली पसंती दर्शविल्याने महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या नेतृत्वांच्या यादीत आदरणीय देवेंद्रजी तिसऱ्या स्थानी विराजमान झाले आहेत. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठीची त्यांची अविरत निष्ठा, जनसेवेची तळमळ आणि राज्याच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटण्याची जिद्द आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
आज आदरणीय देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेतला, तर दूरदृष्टी, निर्णयक्षमता आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या एका प्रभावी नेतृत्वाचे दर्शन घडते. त्यांनी महाराष्ट्राला केवळ विकासाची दिशा नव्हे, तर जागतिक स्पर्धेत सक्षमपणे उभे राहण्याचे सामर्थ्य दिले आहे. विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांनी जगातील अत्याधुनिक संकल्पना महाराष्ट्रात आणल्या. समृद्धी महामार्ग, किनारी महामार्ग (कोस्टल रोड), अत्याधुनिक रस्त्यांचे जाळे, मुंबई मेट्रोचा अभूतपूर्व विस्तार, मुंबईतील महत्त्वाकांक्षी अंडरग्राऊंड मेट्रो प्रकल्प, आधुनिक विमानतळांची उभारणी, जलद वाहतूक व्यवस्था आणि शहरी पायाभूत सुविधांचा वेगवान विकास यामुळे महाराष्ट्र आज देशाच्या विकासाचे नेतृत्व करणारे राज्य म्हणून ओळखले जात आहे.
पालघर जिल्ह्यात उभारला जात असलेला वाढवण बंदर प्रकल्प हा जगातील सर्वात मोठ्या आणि आधुनिक बंदरांपैकी एक ठरणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राला जागतिक सागरी व्यापाराचे महत्त्वपूर्ण केंद्र बनविण्याबरोबरच लाखो रोजगाराच्या संधी निर्माण करणार असून राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास या क्षेत्रांनाही अभूतपूर्व चालना मिळाली आहे. सागरी पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, बंदरांचा सर्वांगीण विकास, किनारपट्टीवरील रोजगारनिर्मिती, मत्स्यव्यवसायाला बळ देणारे निर्णय आणि ‘ब्ल्यू इकॉनॉमी’ला प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांमुळे महाराष्ट्राच्या सागरी सामर्थ्याला नवी ओळख आणि नवी उंची प्राप्त झाली आहे. उद्योग, गुंतवणूक, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, कृषी, जलसंधारण, कायदा-सुव्यवस्था आणि सुशासन या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी विकासाचा वेग कायम ठेवत महाराष्ट्राला नव्या युगाकडे नेण्याचा निर्धार सिद्ध केला आहे. “विकसित महाराष्ट्र” हे केवळ स्वप्न न राहता प्रत्यक्ष वास्तवात उतरविण्यासाठी त्यांचे नेतृत्व आज लाखो नागरिकांसाठी विश्वासाचे आणि प्रेरणेचे प्रतीक बनले आहे.
आदरणीय देवेंद्रजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली मत्स्यव्यवसाय आणि बंदरे क्षेत्रात अनेक लोकांभिमुख निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर राहणाऱ्या लाखो मच्छीमार कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरलेला ऐतिहासिक निर्णय म्हणजे मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा! आदरणीय देवेंद्रजी यांच्या दूरदृष्टीतून राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे मच्छीमारांसाठी विकासाची नवी दारे खुली झाली. याचबरोबर केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या’ धर्तीवर महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मच्छीमारांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना विविध योजना, सवलती व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना भविष्यात मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
महाराष्ट्राला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्याची दूरदृष्टी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दाखवली. प्रशासन केवळ डिजिटल करण्यावर न थांबता, ते अधिक बुद्धिमान, पारदर्शक, वेगवान आणि लोकाभिमुख करण्याचा संकल्प ठेवून राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा अॅनालिटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याचा निर्णय घेत, शासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेला त्यांनी नवी दिशा दिली. शासकीय सेवांचा लाभ नागरिकांपर्यंत अधिक जलद आणि अचूकपणे पोहोचावा, निर्णय प्रक्रियेला गती मिळावी आणि मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या त्रुटी कमी व्हाव्यात, यासाठी AI आधारित प्रणालींचा अवलंब करण्यास प्राधान्य देण्यात आले.
महाराष्ट्रात उद्योग, कृषी, आरोग्य, शिक्षण, महसूल, आपत्ती व्यवस्थापन, स्मार्ट सिटी, पोलीस यंत्रणा, वाहतूक व्यवस्था आणि ई-गव्हर्नन्स अशा विविध क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढविण्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्यात आली आहेत. राज्यातील स्टार्टअप्स, तंत्रज्ञान कंपन्या, संशोधन संस्था आणि शैक्षणिक संस्थांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात संशोधन व नवकल्पनांसाठी प्रोत्साहन देत महाराष्ट्राला AI इनोव्हेशनचे प्रमुख केंद्र बनविण्याची दिशा निश्चित करण्यात आली. यामुळे उद्योगांमध्ये ऑटोमेशन, डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून रोजगारनिर्मिती व गुंतवणुकीलाही नवी चालना मिळत आहे. भविष्यातील तंत्रज्ञानाची गरज ओळखून शासन व्यवस्थेला कृत्रिम बुद्धिमत्तेशी जोडण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय हा महाराष्ट्राच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. आज प्रशासन अधिक वेगवान, पारदर्शक, जबाबदार आणि लोकाभिमुख बनविण्याच्या दिशेने होत असलेल्या परिवर्तनामागे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या आधुनिक व तंत्रज्ञानाभिमुख नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
आज आदरणीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करताना त्यांच्या कार्याची ही यशोगाथा प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरते. अभ्यासपूर्ण निर्णयक्षमता, विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि महाराष्ट्राला जागतिक स्तरावर नेण्याची महत्त्वाकांक्षा यामुळे एक कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. अशा दूरदर्शी, अभ्यासू आणि जनतेसाठी अखंड कार्यरत असलेल्या आदरणीय मुख्यमंत्री मान.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाची घोडदौड अधिक वेगाने सुरू राहो, राज्य उत्तरोत्तर प्रगतीच्या नव्या शिखरांकडे वाटचाल करो आणि जनकल्याणाचा हा प्रवास अधिक यशस्वी ठरो, हीच सदिच्छा!
श्री.नितेश नारायण राणे
(मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री – सिंधुदुर्ग )


Subscribe










