तुळस ग्रामपंचायतीचे नवनियुक्त उपसरपंच मा. नारायण कुंभार यांच्या हस्ते जि. प. गिरोबा शाळा, तुळस येथे नव्या प्रवेशद्वार कमानीचे उद्घाटन उत्साहात.
जि. प. गिरोबा शाळा, तुळस येथे नव्याने उभारण्यात आलेल्या आकर्षक प्रवेशद्वार कमानीचे उद्घाटन नवनियुक्त तुळस ग्रामपंचायतीचे उपसरपंच मा. नारायण कुंभार यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या प्रसंगी उपस्थितांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये होत असलेल्या विकासकामांचे स्वागत केले. नवीन प्रवेशद्वार कमानीमुळे शाळेच्या परिसराच्या सौंदर्यात भर पडली असून विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दलचा अभिमान आणि आपलेपणाची भावना अधिक दृढ होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या विकासकामासाठी आवश्यक ती मोलाची आर्थिक मदत जिल्हा परिषद सदस्या सौ. सुजाता पडवळ यांनी उपलब्ध करून दिली. कामानिमित्त त्या गावाबाहेर असल्याने उद्घाटन सोहळ्यास प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या नाहीत. मात्र, त्यांच्या सहकार्यामुळे हे काम पूर्णत्वास गेले असून उपस्थितांनी त्यांच्या योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमाकांत ठुबरे, वैभव होडावडेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गंगाराम शेळके, शिक्षणतज्ज्ञ रत्नाकर शिरोडकर, महेश बरागडे, शंकर शिरोडकर, राजश्री सावंत, स्वप्नाली शेळके, गायत्री शेळके, शेखर आरोलकर, जयदीप सावंत, अर्जुन सावंत, आनंद नाईक, सीमा नागारगोजे, स्नेहा पवार, शाळेचे मुख्याध्यापक अनिल नागारगोजे, संदीप सावंत, अंगणवाडी सेविका कविता शिरोडकर, दीपलक्ष्मी शिरोडकर तसेच शाळेचे विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही अशाच विकासकामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि शाळेची प्रगती सातत्याने होत राहावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.


Subscribe










