माझ्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त वह्यावाटपाचा कार्यक्रम राबवून समाजसेवाचा वारसा चालू ठेवला

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले ऍड. रजत चव्हाण व श्रीमती भारती चव्हाण यांचे कौतुक

विनायक भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा आंबडपाल व तुळसुली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

माझ्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून त्याचा समाजसेवेचा वारसा चालू ठेवल्याबद्दल मी ऍड. रजत चव्हाण व श्रीमती भारती विनायक चव्हाण यांचे आभार मानतो असे उद्गार जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी काढले. कै. विनायक नामदेव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विनायक भारतीय प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबडपाल आणि लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली येथील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी एकूण ४०० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर, जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, सभापती मिलिंद नाईक, बार कौन्सिलचे अध्यक्ष ऍड. सुरेंद्र माळगावकर, विनायक भारती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा भरती चव्हाण, विनायक भारती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ऍड. रजत चव्हाण, संस्थेचे उपकार्याध्यक्ष श्री सदानंद वारंग ,संस्थेचे जॉईट सेक्रेटरी श्री ए.पी.वारंग,शाळा समिती सल्लागार -श्री मकरंद नाईक, श्री माईनकर गुरुजी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्राथमिक शाळा आंबडपाल येथे वह्या वाटप कार्यक्रमात प्रमुख मान्यवर कुडाळ मंडळ अधिकारी श्री मसुरकर तसेच आंबडपाल तलाठी श्रीमती अरतकर मॅडम आंबडपाल सरपंच महेश मेस्त्री तसेच उपस्थित मान्यवर सचिन सावंत, सुदाम सावंत, किशोर सावंत, ओंकार नाईक, महेंद्र नाईक , प्रेरणा नाईक , शरद चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य गणपत चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रज्ञा सावंत, शाळा कमिटीचे अध्यक्ष सुरेश तानिवडे, उपाध्यक्ष भगवान सावंत, मुख्याध्यापक कदम मॅडम, सारिका कुडाळकर, विशाखा सावंत ,सुनंदा सावंत उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले की, आजचा दिवस माझ्यासाठी फार महत्त्वाचा असून विनायक चव्हाण हे माझे जीवलग मित्र होते. मला त्यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळाले असून स्वर्गीय आबा मुंज आणि विनायक चव्हाण यांच्या समवेत विकासाच्या अनेक योजनांवर त्यावेळी चर्चा होत असल्याचे सांगत त्यांनी स्वर्गीय विनायक चव्हाण यांच्या आठवणी ताज्या केल्या.

यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी आपले विचार मांडताना सुरवातीच्या काळात स्वर्गीय विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्याचे सांगितले. त्यांच्या आठवणी जपण्यासाठी तसेच सामाजिक कार्यात केलेल्या योगदानाची परंपरा चालू ठेवण्यासाठी राबवलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे ते यावेळी म्हणाले. पुढे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, शिक्षण ही आपल्या यशाची पहिली पायरी असून मोठ्या स्वप्नांची सुरुवात ही शाळेतूनच होते. शाळेत पडलेले पहिले पाऊल कुटुंबाबरोबरच गाव आणि देशाचे स्वप्न घेऊन येते. उद्याच्या विकसित भारताचे भविष्य आपल्याच हातात असून भविष्यात आपल्यापैकी काहीजण इंजिनियर, डॉक्टर, वकील, समाजसेवक होतील. परंतु आयुष्यात यशस्वी झाल्यानंतर आपल्या कुटुंबाप्रमाणेच शाळेकडे देखील लक्ष असले पाहिजे. याचा एक नवा आदर्श ऍड. रजत चव्हाण यांनी घालून दिला असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

यानंतर पंचायत समिती कुडाळचे सभापती मिलिंद नाईक यांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तुळसुली हा माझा जन्मगाव असून मी या गावचा सुपुत्र आहे. त्यामुळे या शाळेत मी हक्काने येत असतो असे ते यावेळी म्हणाले. पुढे ऍड. रजत चव्हाण व श्रीमती भारती चव्हाण यांचे कौतुक करताना म्हणाले की, विनायक चव्हाण हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आंबडपाल पंचक्रोशीत काम करत होते. त्यांच्या निधनानंतर विनायक भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत स्वर्गीय विनायक चव्हाण यांना आदरांजली वाहण्याचे काम ते सातत्याने करत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. त्याच अनुषंगाने आजचा कार्यक्रम होत असल्याचे म्हणत त्यांनी ऍड. रजत चव्हाण व श्रीमती भारती चव्हाण यांचे मुक्तकंठाने कौतुक केले.

यानंतर विनायक भारती प्रतिष्ठानचे संस्थापक ऍड. रजत चव्हाण यांनी आपले विचार मांडले. या शाळेचा मी विद्यार्थी असून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेचे ऋण फेडण्याची संधी मिळाली असल्याचे त्यांनी म्हटले.

विनायक भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून ऍड. रजत चव्हाण व श्रीमती भारती चव्हाण यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका मनाली नाईक यांनी, प्रास्ताविक अनिल वारंग यांनी तर आभार स्मिता परब यांनी मानले.

error: Content is protected !!