स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई
सिंधुदुर्गनगरी : मुंबई – गोवा महामार्गावर ओरोस येथे स्थानिक गुन्हा अन्वेष्णच्या शाखेने केलेल्या कारवाईत तब्बल २१,६३,४५०/- रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ आणि ८,५०,०००/- रुपये किमतीच्या अशोक लेलँड बडा दोस्त वाहन असा एकूण ३०,१३,४५०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक ३ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
यांबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई गोवा महामार्गावरून गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषणला मिळाली. त्यानुसार सापळा रचत ओरोस खर्येवाडी येथील खालसा पंजाब धाबा येथून गोपाळ राजाराम गवस (वय ३४) राहणार दापोली अन्नपूर्णावाडी तालुका सावंतवाडी, शिरीष सुभाष गवळी (वय ३५) राहणार माठेवाडा सावंतवाडी, सिद्धेश सुभाष केसरकर (वय ३४) राहणार आळेवाडी बांदा सावंतवाडी यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर अन्नसुरक्षा व मानके कायदा सन 2006 चे कलम 26(2),7(3)(d), 27(3)(इ), 30(2)(ए), 59 तसेच भारतीय न्यायसंहिता सन 2023 चे कलम 123, 223 ,274 ,275, 3(५) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा.श्री.मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, मा.कु.नयोमी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI हनुमंत भोसले, ASI सुरेश राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल विल्सन डिसोझा,आशिष जामदार , पोलीस कॉन्स्टेबल महेश्वर समजीसकर, ऋषिकेश टोपले यांनी केलेली असून सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Subscribe










