देश महासत्ता होण्यासाठी तरुणाईने जागृत रहा, विज्ञानाची कास धरा – आमदार प्रमोद जठार

विजयदुर्ग किल्ल्यावर “विश्व हेलियम दिन” उत्साहात साजरा

विजयदुर्ग : सद्यस्थितीत विद्यार्थी, तरुण-तरुणीनी देशाच्या भविष्यासाठी विज्ञानाची कास धरली पाहिजे. जपान, जर्मनी, अमेरिका आदी देश महासत्ता होत असताना जेन जीनी प्रत्येक विषयात प्रश्न उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना जागृत ठेवलं आणि का…. असं का आदी प्रश्नांचा भडीमार केला तर यातून आपला देश महासत्तेला गवसणी घालेल असा विश्वास आमदार प्रमोद जठार यांनी विजयदुर्ग किल्ल्यामध्ये व्यक्त केला. निमित्त होतं ते विश्व हेलियम दिनाचे!

कासार्डे येथील सुनीता शांताराम ट्रस्ट आणि विजयदुर्ग ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने १८ वा विश्व हेलियम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विजयदुर्ग एसटी डेपो ते विजयदुर्ग किल्ला अशी भव्य रॅली काढण्यात आली. हेलियम वायूने भरलेले फुगे घेऊन ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत विद्यार्थी, ग्रामस्थ आणि विज्ञानप्रेमींची ही रॅली विजयदुर्ग किल्ल्यातील सायबाचे ओटे येथे नेण्यात आली. यावेळी विजयदुर्ग हायस्कूल, विजयदुर्ग उर्दू हायस्कूल, देवगड येथील मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेज तसेच दीक्षित फाउंडेशनच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

सायबाचे ओटे येथे हेलियमच्या फलकाला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ‘जय जवान जय किसान जय विज्ञान — च्या घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला होता. यावेळी बोलताना जठार यांनी सांगितलं की, विजयदुर्ग येथील आरमार केंद्राचे काम प्रगतीपथावर असून आणखी ५ कोटींचा निधी यासाठी उपलब्ध झाला आहे. दरम्यान, इतिहासप्रेमी राजेंद्र परुळेकर म्हणाले की, गेली १८ वर्षे विजयदुर्ग किल्ल्यामध्ये विश्व हेलियम दिन साजरा केला जातो. याचे फलित म्हणजेच येथील आरमार केंद्राची उभारणी ! भविष्यात या माध्यमातून विजयदुर्ग किल्ल्यावर लाईट आणि साऊंड शो होऊन येथील पर्यटनाला नवी दिशा मिळेल असे ते म्हणाले.
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर सुनील आठवले यांनी हेलियम वायूच्या शोधाची इत्यंभूत माहिती विद्यार्थ्यांना देताना विज्ञानाचं नासा केंद्र, अहमदाबाद येथील इस्त्रो सेंटर या धर्तीवर विजयदुर्ग येथील या भागाला ‘ हेलियम परिसर ‘ हे नाव द्यावे अशी इच्छा व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, सायबाचे ओटे आणि हेलियमचा शोध या गोष्टींचं आमदार प्रमोद जठारानी पुनरुज्जीवन केलं. आता निधीचीही कसली चिंता नसल्याने विजयदुर्ग हे विज्ञान पर्यटन केंद्र होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, कोल्हापूर येथून खास उपस्थित असलेले विज्ञानप्रेमी पवन परुळेकर तसेच प्रसाद देवधर, रियाज काझी यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केलं. त्यावेळी देवगड सभापती गणेश राणे, विजयदुर्ग सरपंच रियाज काझी, पं. स. सदस्य रवींद्र तिर्लोटकर, सुप्रिया आळवे, चंद्रहास सावंत, ग्रा. पं. सदस्य शुभा कदम, दिनेश जावकर, माजी सरपंच प्रसाद देवधर, प्रदीप साखरकर, पोलीस पाटील राकेश पाटील आदि उपस्थित होते. शेवटी हेलियम संदर्भात घोषणा देऊन आणि आकाशात फुगे सोडून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणास्तव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे तसेच भाऊ सामंत, विकी तोरस्कर यांनीही उपस्थिती लावून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!