मालवण – सर्जेकोट येथील २२ वर्षीय युवकाला बेदम मारहाण

प्रकृती गंभीर; गोवा बांबुळी येथे उपचार सुरू

मोबाईलवर फोन करून बोलावून घेत केली मारहाण

मालवण : सर्जेकोट पिरावाडी येथील कुणाल नागोजी सादये या २२ वर्षीय युवकाला मोबाईलवर फोन करुन घरातून बोलावून घेत कांदळगाव राणेवाडी ते हडी मार्गावर अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी सायंकाळी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत शरीरातील काही भागांमध्ये त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला खाजगी रूग्णालयातून ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले होते. त्याठिकाणी त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले होते. आता त्याच्यावर गोवा बांबुळी येथे आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कुणाल याला मारहाण करण्यात आल्याबद्दल त्याचे मामा नारायण आडकर यांनी सर्जेकोट ग्रामस्थ यांच्या समवेत शनिवारी सायंकाळी मालवण पोलीस ठाण्यात जात पोलीसांना घटनेची माहिती दिली. पोलीसांनी याप्रकरणी रविवारी चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी सर्जेकोट सरपंच निलीमा परूळेकर, संदीप शेलटकर, नितीन परूळेकर, जगन्नाथ सावजी, संतोष शेलटकर, जनार्दन आजगावकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी पोलीसांना या प्रकरणी संशयीतांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल याला ओळखीच्या व्यक्तीने मोबाईलवर फोन करून कांदळगाव राणेवाडी ते हडी परिसरात बोलावून घेतले होते. त्यानंतर त्याला त्याठिकाणी बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीवेळी त्याचा मोबाईल घेऊन तोही फॉरमॅट मारण्यात आला. मारहाणीतून तो आपला जीव वाचवून घरी आला. त्यानंतर आपला जीव वाचवून घरी आला. त्यानंतर त्याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्याला खाजगी रूग्णालयात नेण्यात आले होते, त्याने मारहाणीच्या भितीने आपल्या आई वडीलांना कोणतीही कल्पना दिलेली नव्हती. त्याची प्रकृती अधिकच बिघडल्यानंतर त्याला ग्रामीण रूग्णालयातून ओरोस जिल्हा रूग्णालय येथे हलविण्यात आले. त्याठिकाणी उपचार सुरू असतानाच त्याची प्रकृती अधिकच गंभीर बनत गेली होती.

कुणाल याने आपले मामा नारायण आडकर यांना ओरोस याठिकाणी उपचार सुरू असताना आपल्याला मारहाण झाल्याचे सांगितले. यामुळे त्यांनी त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यामधील सर्व डाटा डिलीट केल्याचे दिसून आले होते. यानंतर कुणाल हा बोलण्याच्या मनस्थितीतच नसल्याने त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. त्याच्या शरीरात मारहाणीमुळे अनेक गंभीर आजार निर्माण झाल्याचेही आडकर यांनी सांगितले. यामुळे आडकर यांनी आज मालवण पोलीस ठाणे गाठत घटनेची माहिती दिली आहे. मात्र पोलिसांनी मारहाणीची रीतसर माहिती घेऊन तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला.

कुणाल हा सध्या बोलण्याच्या मनःस्थितीत नसल्याने पोलिसांनी प्राथमिक माहिती घेऊन त्याच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासून संबंधितांचा शोध घ्यावा, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे. सर्जेकोट सरपंच निलीमा परूळेकर आणि संदीप शेलटकर यांनी या घटनेचा पोलीसांनी गांभिर्याने तपास करून मोबाईल लोकेशनच्या आधारे मारहाणकर्त्यांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. सादये कुटुंबिय गरीब असून कुणाल हा मोलमजुरी करत होते. गोवा बांबुळी येथे त्याचे आई वडील त्याच्यासोबत असल्याने आज पोलीसात तक्रार देण्यासाठी मामा आडकर हे आले होते. आम्ही ग्रामस्थ सादये कुटुंबियांच्यासोबत असून त्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तींचा शोध होणे आवश्यक आहे. आज त्याची प्रकृती नाजुक असल्याने या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी आम्ही पोलीसांना विनंती केली आहे. यात दोषींचा शोध लवकरात लवकर होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!