अणुऊर्जा प्रकल्पावर सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी; राणे पिता-पुत्रांच्या वक्तव्यांत विसंगती – सुशांत नाईक

प्रकल्पविरोधी जनतेसोबत शिवसेना ठाम; आंबा बागायतदारांच्या जलसमाधी आंदोलनालाही पाठिंबा

देवगड : सिंधुदुर्गातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, राज्य सरकारने याप्रकरणी स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली. देवगड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नाईक म्हणाले की, एका बाजूला खासदार नारायण राणे यांनी अणुऊर्जा प्रकल्पाला समर्थन दिले, तर दुसरीकडे पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रकल्पाबाबत माहिती नसल्याचे सांगितले. राज्य सरकारने प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार (एमओयू) केल्याचा दावा करत संबंधित कागदपत्रे आणि छायाचित्रे पत्रकार परिषदेत सादर करण्यात आली. सर्वेक्षण प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही पालकमंत्र्यांनी माहिती नसल्याचे सांगणे म्हणजे जनतेची दिशाभूल असल्याचा आरोप त्यांनी केला.

जनतेचा विरोध लक्षात आल्यानंतर पालकमंत्र्यांनी भूमिका बदलल्याची टीका करत, अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिक जनता रस्त्यावर उतरल्यास शिवसेना त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहील, असे नाईक यांनी स्पष्ट केले. कोकणात पर्यावरणाला हानी पोहोचविणारे प्रकल्प नकोत, तर आंबा, काजू प्रक्रिया उद्योग, संशोधन केंद्रे आणि स्थानिकांना रोजगार देणारे उद्योग उभारावेत, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी ३ जुलै रोजी आंबा बागायतदारांनी जाहीर केलेल्या जलसमाधी आंदोलनाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई वेळेत मिळाली असती, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना पुन्हा सिंधुदुर्गात येण्याची वेळ आली नसती, असेही नाईक म्हणाले.
पत्रकार परिषदेला तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, दादा सावंत, तुषार धुरी, गुरुनाथ धुवाळी, विकास कोयंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!