कणकवली : सिंधुदुर्गात मायनिंग, औष्णिक ऊर्जा प्रकल्प यासारखे विनाशकारी प्रकल्प लादले जात आहेत. या प्रकल्पांतून सत्तेत असलेले राणे कुटुंबीय स्वतःचा अर्थपूर्ण फायदा करून घेत आहे. सिंधुदुर्गात होणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांमुळे निसर्ग हासाबाबत सत्ताधाऱ्यांना देणे-घेणे नाही. विनाशकारी प्रकल्पांना जनतेचा विरोध आहे. या प्रकल्पांविरोधात सिंधुदुर्गावासीयांना आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. हे प्रकल्प होण्यासाठी सत्ताधारी आग्रही आहेत. मात्र, ठाकरे शिवसेना हे होऊ होऊ देणार नाहीत, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर
यांनी दिला.
शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख डी. डी. देसाई यांनी सिंधुदुर्ग जिल्हा विकणे आहे, अशी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यांच्या जाहिरातीचे अनुकरण सत्तधाऱ्यांनी केले असून जिल्ह्यातील जमिनी परप्रांतीयांनी विकण्याचे काम सुरू केल्याने जिल्हा विकणे आहे अशी स्थिती आहे, अशी टीकास्त्र त्यांनी सोडले.
येथील संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपरकर बोलत होते. उपरकर म्हणाले, वेंगुर्ले, मालवण, देवगड यासह अन्य तालुक्यातील जमिनी परप्रांतियांना
विकण्याचे कामे सत्ताधारी मंडळी करीत आहे. परप्रांतियांनी जमिनी खरेदी करण्यासाठी एका सहकारी बँकद्वारे कर्ज देण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे. सिंधुदुर्ग निसर्गसंपन्न जिल्हा आहे. या जिल्ह्यात मायनिंग, औष्णिक ऊर्जा यासारखे प्रकल्प सत्ताधाऱ्यांकडून लादले जात आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील आजगावात मायनिंग प्रकल्प सुरू करून जिंदाल कंपनीला रान मोकळे करून दिले जात आहे. कोकणवासीयांचा विनाशकारी प्रकल्पांना विरोध आहे. या
प्रकल्पांविरोधात कोकणवासीयांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे या भूमिकेला शिवसेनेचा पाठिंबा आहे, असे उपरकर म्हणाले आजगाव येथील मायनिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध आहे. हा विरोध पालकमंत्र्यांच्या लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांचा प्रकल्पाला विरोध असल्यास हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. या भूमिकेवर पालकमंत्र्यांनी ठाम राहावे, असा टोला उपरकरांनी लगावला. ज्या प्रकल्पांमध्ये आर्थिक फायदा आहे, त्य प्रकल्पांतून पालकमंत्री स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्यात माहीर आहे, अशी टीकाह त्यांनी केली.


Subscribe










