केंद्रीय नोकरीचे आमिष दाखवून १.२० कोटींची फसवणूक

कणकवलीत तिघांविरुद्ध तक्रार दाखल

पाच उमेदवारांना खोटी नियुक्तीपत्रे; दिल्लीत मेडिकल, प्रशिक्षणाच्या नावाखालीही दिशाभूल…

कणकवली : केंद्रीय शासकीय नोकरीचे आमिष दाखवून पाच उमेदवारांकडून तब्बल १ कोटी २० लाख रुपये उकळून खोटी नियुक्तीपत्रे देत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कणकवली येथील विनिता विवेक मुंज, पुणे येथील सुबत्ता गिरीश माळी आणि मनोज जैन यांच्याविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सेवानिवृत्त नेत्रचिकित्सक अधिकारी सुनील दामोदर धुरे यांनी ही तक्रार दिली असून, या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारीनुसार, धुरे यांच्या पत्नी सुनीता धुरे या आरोग्य विभागात कार्यरत असताना त्यांची विनिता मुंज हिच्याशी ओळख झाली होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये विनिता मुंज हिने केंद्रीय शासकीय कार्यालयांमध्ये स्वतःच्या ओळखी असल्याचा दावा करत धुरे यांच्या मुलांना केंद्रीय शासनाच्या सेवेत नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. प्रत्येक उमेदवारासाठी २४ लाख रुपये द्यावे लागतील, तसेच नियुक्ती आदेश मिळाल्याशिवाय पुढील व्यवहार होणार नाही, अशी खात्री तिने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

विश्वास संपादन केल्यानंतर तिच्या सांगण्यावरून धुरे यांनी ११ डिसेंबर २०२४ रोजी पुणे येथील सुबत्ता गिरीश माळी यांच्या आयसीआयसीआय बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे ६ लाख रुपये जमा केले. त्यानंतर १० जानेवारी २०२५ रोजी मनोज जैन यांच्या खात्यावर आणखी ४ लाख रुपये पाठविण्यात आले. उमेदवारांकडून अर्ज भरून घेण्यात आले तसेच मोबाईलवर ओटीपी पाठवून ऑनलाइन प्रक्रिया सुरू असल्याचा भास निर्माण करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

यानंतर धुरे यांच्या दोन्ही मुलांसह इतर उमेदवारांना दिल्ली येथे मेडिकल तपासणीसाठी पाठविण्यात आले. विनिता मुंज, वनिता गोसावी आणि मधुरा मांजरेकर यांच्यासह सर्वजण विमानाने दिल्लीला गेले. तेथे सुबत्ता माळी आणि मनोज जैन यांनी उमेदवारांची भेट घेतली. मेडिकलच्या नावाखाली प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे एकूण ५ लाख रुपये स्वीकारण्यात आले. त्यानंतर सर्व उमेदवारांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेऊन रक्त, फिंगरप्रिंट आणि रेटिना तपासणी करण्यात आल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.

मार्च २०२५ मध्ये उमेदवारांना फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नियुक्तीपत्र पोस्टाद्वारे प्राप्त झाले. मात्र काही दिवसांनी त्या भरतीमध्ये अडचणी असल्याचे सांगून त्यांना मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेजमध्ये नोकरी मिळणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार २१ मे २०२५ रोजी संबंधित विभागाचेही नियुक्तीपत्र पोस्टाने पाठविण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, विनिता मुंज हिने वेळोवेळी धुरे यांच्या घरी जाऊन रोख स्वरूपात आणखी ३८ लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. ही रक्कम पत्नीच्या भविष्य निर्वाह निधीतील १० लाख रुपये, जिल्हा परिषद आरोग्य पतसंस्थेकडून घेतलेले ३० लाख रुपयांचे कर्ज तसेच बचत आणि आरडीमधील ८ लाख रुपये अशा विविध स्रोतांतून उभारण्यात आली होती. अशाप्रकारे धुरे कुटुंबाने एकूण ४८ लाख रुपये दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

रक्कम स्वीकारल्यानंतरही उमेदवारांना अनेकवेळा दिल्लीला बोलावण्यात आले. दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठीही पाठविण्यात आले; मात्र तेथे कोणतेही प्रशिक्षण न झाल्याने सर्वजण नोव्हेंबर २०२५ मध्ये परतले. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही नोकरी न मिळाल्याने संशय बळावला.

अखेरीस १४ फेब्रुवारी २०२६ रोजी एक लाख रुपयांचा धनादेश आणि ४ जून २०२६ रोजी ५० हजार रुपये रोख तसेच ५० हजार रुपये यूपीआयद्वारे परत करण्यात आले. म्हणजेच ४८ लाख रुपयांपैकी केवळ २ लाख रुपये परत मिळाले असून उर्वरित रक्कम अद्याप मिळालेली नसल्याचा आरोप धुरे यांनी केला आहे.

या प्रकरणात प्रताप प्रभाकर दळवी, मनीषा मनोहर नाईक आणि संतोष बाबाजी मसके या पालकांचीही फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. प्रत्येक पाल्याकडून २४ लाख रुपये या प्रमाणे एकूण पाच उमेदवारांकडून १ कोटी २० लाख रुपये उकळून खोटी नियुक्तीपत्रे देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या तक्रारीच्या आधारे संबंधित तिघांविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली असून, कणकवली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

error: Content is protected !!