सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० या योजनेची सखोल चौकशी करावी

आ. निलेश राणे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट घटक २.० या योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून सदर योजनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, सदर योजनेअंतर्गत प्रकल्पाच्या एकूण रक्कमेच्या ४७% निधीमधून नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन कार्यक्रम (NRM) कामे यामध्ये सलग समतल चर, मजगी, कंपोझिट गॅबियन बंधारा, वळण बांध, माती नाला बांध, सिमेंट नाला बांध यासारख्या उपचाराची कामे करावयाची होती. तसेच ४७% निधीच्या २०% मधून फळबाग लागवड करावयाची होती. परंतु दोडामार्ग तालुक्यामध्ये बोगस कामे केलेली आहेत. तांत्रिकदृष्या चुकीच्या जागेवर कामे केलेली आहेत. काही कामे तर कागदावर पूर्ण केलेली आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे कामे केलेली नाहीत.

सदर पाणलोट योजनेची चौकशी समिती स्थापन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित शासकीय व अशासकीय अधिकारी व कर्मचारी यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी. शासनाच्या निधीचा गैरवापर केलेला असल्याने संबंधित निधी शासन खाती तत्काळ वर्ग करून घेण्यात यावा. अशी मागणी आ. निलेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

error: Content is protected !!