“भारुड महोत्सव 2026″ चे नांदगाव तिठा येथे रविवार,दि. ९ ऑगस्ट रोजी भव्य आयोजन – प्रकाश पारकर

कोकणातील लोककलेचा भव्य सोहळा: कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेचे आयोजन

कणकवली : कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था, कणकवली यांच्या वतीने कोकणातील लोकप्रबोधन, समाजप्रबोधन व अध्यात्माचा प्रभावी लोककलाप्रकार असलेल्या भारुड कलेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने “भारुड महोत्सव – २०२६”या भव्य सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा महोत्सव रविवार,दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत नांदगाव तिठा, नांदगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
भारुड हा महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील लोकप्रबोधन, समाजप्रबोधन व अध्यात्माचा प्रभावी लोककलाप्रकार असून, भारुडाच्या माध्यमातून रामायण, महाभारत, गरुडपुराण तसेच विविध पुराणग्रंथांतील आणि ऐतिहासिक कथांतील प्रसंग अत्यंत रंजक, प्रभावी व विचारप्रवर्तक शैलीत जनसामान्यांपर्यंत पोहोचविले जातात. या कथा केवळ मनोरंजनासाठी नसून समाजाला नैतिकता, संस्कार, कर्तव्य, भक्ती आणि जीवनमूल्यांचा संदेश देणाऱ्या आहेत.
बदलत्या काळात भारुड सादरीकरणाचे प्रमाण कमी होत असून, ही पारंपरिक लोककला लोप पावण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारुड कलेचा सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, भजनी बुवांचा भारुडाकडे पुन्हा कल वाढावा आणि भजन संस्कृती अधिक समृद्ध व्हावी, या उदात्त हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सन २००९ मध्ये स्थापन झालेल्या कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेने आजपर्यंत भजनी कार्यशाळा,मृदुंग वादन कार्यशाळा,भजन स्पर्धा,भजनी मेळावे, नामवंत कलाकारांचे सादरीकरण,भजनी कलाकारांच्या पाल्यांचा गुणगौरव,शासनस्तरावरील विविध मागण्यांचा पाठपुरावा तसेच गरजू भजनी कलाकारांना आर्थिक मदत असे अनेक उपक्रम सातत्याने राबविले आहेत.
या महोत्सवासाठी महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री. नितेशजी राणे यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले असून,त्यांनी निमंत्रण स्वीकारून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.
या महोत्सवामध्ये विविध मान्यवर भारुड कलाकार व भजनी बुवा यांचे दर्जेदार सादरीकरण होणार असून,भजनप्रेमी, भारुड रसिक,वारकरी बांधव तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक व आध्यात्मिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेस तालुकाध्यक्ष श्री.प्रकाश सखाराम पारकर,उपाध्यक्ष मारुती मेस्त्री,सचिव निलेश ठाकूर,खजिनदार श्री.सुदर्शन फोपे,सहसचिव श्री.मयूर ठाकूर,श्री.चंद्रशेखर चव्हाण,श्री मंगेश खाडये, लक्ष्मण बागवे, चंद्रकांत गुरव, श्रीकांत शिरसाट, पंढरी जाधव, महानंदा चव्हाण, संस्थेचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!