जानवलीत निवृत्त आर्मी जवानांच्या घरातून साडेतीन लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला

अज्ञात चोरट्या विरोधात कणकवली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

कणकवली : कणकवली तालुक्यातील जानवली घरटनवाडी येथे निवृत्त आर्मी जवानाच्या राहत्या घरातून सुमारे ३ लाख २५ हजार ५५२ रुपये किमतीचे सहा तोळे ६४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार सुधीर घारकर तपास करीत आहेत.

याबाबत जानवली घरटनवाडी येथील दिलीप गणपत राणे (वय ६२) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ते पत्नी दीप्ती राणे यांच्यासह राहतात, तर मुलगी धनश्री राणे नोकरीनिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असून अधूनमधून गावी येत असते.

दीप्ती राणे या डायबेटीस, सीकेडी स्टेज-५, ओल्ड सीव्हीए, हायपरटेन्शन, अनिमिया व रेटिनोपॅथी या गंभीर आजारांनी त्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचारासाठी ७ऑगस्ट रोजी गोवा येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये जाण्याचे नियोजन असल्याने त्यांनी ५ ऑगस्ट रोजी सकाळी आठच्या सुमारास आपले मंगळसूत्र घरातील तिसऱ्या खोलीतील देवघरात ‘वामन हरी पेठे’च्या पाऊचमध्ये ठेवले होते.

यानंतर सकाळी नऊच्या सुमारास दिलीप राणे हे पत्नीची औषधे आणण्यासाठी ओरोस येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये
गेले. दुपारी सुमारे १२.१० वाजता घरी परतल्यानंतर पत्नीने देवघराजवळ काहीतरी आवाज आल्याचे सांगत मंगळसूत्र तपासण्यास सांगितले. देवघरातील पाऊच उघडून पाहिले असता त्यामध्ये ठेवलेले मंगळसूत्र गायब असल्याचे निदर्शनास आले. घरात सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ते मिळून आले नाही.

फिर्यादीनुसार, दिलीप राणे बाहेर गेले असताना त्यांची सख्खी भाची कविता चंद्रकांत सावंत या पूर्वनियोजितप्रमाणे दीप्ती राणे यांना पाहण्यासाठी व आंघोळ घालण्यासाठी घरी आल्या होत्या. त्या कालावधीत फिर्यादी, त्यांची पत्नी आणि भाची यांच्याशिवाय अन्य कोणीही घरात आले नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

चोरीस गेलेले मंगळसूत्र हे पाच पदरी, काळ्या मण्यांसह सोन्याची चैन साखळी व सोन्याची छोटी पट्टी असलेले जुने वापरातील असून त्याची किंमत ३ लाख २५ हजार ५५२ रुपये इतकी आहे. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी १२.१० या कालावधीत अज्ञात व्यक्तीने देवघरातील ‘वामन हरी पेठे’च्या पाऊचमधून हे मंगळसूत्र चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून, मंगळसूत्र मिळाल्यास ते ओळखू शकत असल्याचे फिर्यादीने आपल्या जबाबात म्हटले आहे.

error: Content is protected !!